खा. महाडिक पवार यांच्यासोबत आल्याच्या चर्चेने रंगत-स्वागतासाठी विश्रामगृहावर झुंबड : कार्यकर्ते चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:32 AM2018-11-23T10:32:15+5:302018-11-23T10:35:57+5:30
ज्यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादीतूनच उघड विरोध झाला, ते खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच पुण्यातून गाडीतून आल्याची चर्चाच गुरुवारी दुपारी पवार यांच्या स्वागतावेळी विश्रामधामवर जास्त रंगली. पवार यांच्या स्वागतासाठी नेते व कार्यकर्त्यांची चांगलीच झुंबड उडाली.
कोल्हापूर : ज्यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादीतूनच उघड विरोध झाला, ते खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच पुण्यातून गाडीतून आल्याची चर्चाच गुरुवारी दुपारी पवार यांच्या स्वागतावेळी विश्रामधामवर जास्त रंगली. पवार यांच्या स्वागतासाठी नेते व कार्यकर्त्यांची चांगलीच झुंबड उडाली. पवार नातेवाइकांच्या लग्नानिमित्ताने शनिवारपर्यंत सपत्निक कोल्हापुरात आहेत.
नियोजित दौऱ्यानुसार ते दुपारी साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृहावर येणार होते. त्यामुळे तिथे माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजू लाटकर, आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होेते. तोपर्यंत तिथे कुणीतरी खासदार महाडिक हे पवार यांच्यासोबतच गाडीतून येत असल्याची माहिती सोडून दिली. आर. के. पोवार यांनीही त्यास दुजोरा दिला. आम्ही ज्यांच्याविरुद्ध तक्रार करायची, तेच साहेबांसोबत येत असल्याने कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीचा विषयच संपला, अशीही पुस्ती ‘आर. के.’ यांनी जोडली. त्यावर एका कार्यकर्त्याने ‘सासूसाठी वाटून घेतले आणि सासूच वाटणीला आली...’ अशी टिप्पणी केल्यावर सगळेच हास्यात बुडाले.
ही चर्चा सुरू असतानाच खासदार महाडिक स्वत:च्या गाडीतून एकटेच विश्रामगृहावर आले व ते पवार यांच्यासोबत येत असल्याची चर्चाच खोटी ठरली. त्यांना पाहून पत्रकारांनी आर. के. पोवार यांना छेडले व तुम्ही खोटी माहिती दिल्याचे सांगितले; परंतु पोवार तरीही दिलेल्या माहितीवर ठाम होते. शेवटी पत्रकारांनी पोवार यांच्या समक्ष महाडिक यांनाच विचारणा केल्यावर त्यांनी पवार यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभा पवार या गाडीत त्यांच्यासोबत असल्याने मी त्यांच्या गाडीतून आलो नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरच या चर्चेवर पडदा पडला.
विश्रामगृहावर पवार आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अक्षरश: झुंबड उडाली. ते सुटमध्ये गेल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ गेलेल्यांनाही बाहेर थांबण्यास सांगण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर पाच मिनिटांनी पवार बाहेर आले आणि सर्वांची भेट घेतली. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, सुरेखा शहा, अशोक जाधव, कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबूराव हजारे, मदन कारंडे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, शहराध्यक्षा जहिदा मुजावर, युवराज पाटील, नविद मुश्रीफ, भैय्या माने,चंद्रकांत वाकळे, मधुकर देसाई, धनाजी जाधव, दीपक पाटील, यांच्यासह विविध तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मुश्रीफ, कुपेकर अधिवेशनामुळे अनुपस्थित
मुंबई येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार संध्यादेवी कुपेकर या अनुपस्थित होत्या. आज, शुक्रवारपासून अधिवेशनाला सुट्ट्या असल्याने हे दोघेही आज कोल्हापुरात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कांही राजकीय चर्चा आज दुपारनंतरच होण्याची शक्यता आहे.