कुष्ठरोग्यांना जेवणही निकृष्ट

By admin | Published: November 21, 2014 11:35 PM2014-11-21T23:35:30+5:302014-11-22T00:02:06+5:30

शेंडा पार्कातील रुग्णालय : शासकीय यंत्रणाच ‘कुष्ठ’; ना मदत करते, ना पोट भरते

Eating leprosy is not worth it | कुष्ठरोग्यांना जेवणही निकृष्ट

कुष्ठरोग्यांना जेवणही निकृष्ट

Next

भारत चव्हाण - कोल्हापूर --असह्य आजाराने त्यांचे संपूर्ण जीवन आधीच शापित बनलंय. घरच्यांनी तर केव्हाच बाहेर काढलंय. सरकारनं निर्माण केलेला आधार हाच त्यांच्या जगण्याचा आशेचा किरण बनला खरा; परंतु गेल्या काही वर्षांपासून या हक्काच्या आधारानेही त्यांना निराधार केलंय.
ना कोणत्या सुविधा, ना उपचार करणारी यंत्रणा! जेवण तर ताटात असलं पडतंय की काही सांगायची सोयच राहिलेली नाही. जेवढं मिळतं ते सकस तर नाहीच; शिवाय त्यानं पोटही भरत नाही. नशिबानं, समाजानं आणि मायबाप सरकारनं दिलेल्या यातना सोसता-सोसता त्यांचा जीव अक्षरश: मेटाकुटीला आलाय. या वेदना आहेत शेंडा पार्क येथील कुष्ठधाम येथील कुष्ठरोगी रुग्णालयात असलेल्या असाहाय्य कुष्ठरोगी बांधवांच्या!
स्थानिक पातळीवरील काही सरकारी अधिकारीही या अवस्थेमुळे बेचैन झाले आहेत; परंतु त्यांना कोणी दाद लागू देत नाहीत. ‘प्रस्ताव प्रलंबित आहेत,’ यापलीकडे सरकारी पातळीवर त्यांना कोणतेही उत्तर मिळत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनीही हात टेकले आहेत. सरकारी उदासीनतेमुळे या गरीब, निराधार आणि समाजाने वाळीत टाकलेल्या रुग्णांची मात्र आबाळ होऊ लागली आहे.
जवाहरनगरातून आर.के.नगरला जाणाऱ्या रस्त्यावर शेंडा पार्क वसाहतीत जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली कुष्ठरोगी बांधवांसाठी एक रुग्णालय चालविले जाते. हे रुग्णालय केवळ कोल्हापूर जिल्ह्यासाठीच नाही, तर सांगली, सातारा, कोकण परिसरातील रुग्णांनाही सोयीचे आहे. येथे बाह्यरुग्णांवर उपचार केले जातात, तसे काही रुग्ण औषधोपचारासाठीही दाखल झालेले आहेत. महिनोन्महिने उपचारांसाठी राहावे लागत असल्याने रुग्णांची औषधोपचारांसह खाण्यापिण्याची, चहानाष्ट्याची तसेच राहण्याची सोय मोफत केली गेली आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून अनुदानाअभावी या सुविधा देण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. (पूर्वार्ध)


सुविधांची वानवा
रुग्णालयातील खोल्यात कॉट पुरविण्यात आले असले तरी आता ते मोडकळीस आलेले आहेत. बऱ्याच खोल्यांत अंधुक उजेडाचे बल्ब लावलेले आहेत. मोकळा परिसर आणि पडीक जमीन असल्याने त्या परिसरात रात्री डासांचा उच्छाद सहन करावा लागत आहे. रुग्णांना कपडे, चादरी कधीकाळी दिलेल्या आहेत. त्याही आता जीर्ण झालेल्या आहेत. रुग्णांच्या जखमांवर मलमपट्टी करायला ड्रेसर नाही; त्यामुळे एक साधा कर्मचारीच अन्य रुग्णांना सोबत घेऊन हे काम पूर्ण करतो.


शेंडा पार्क येथे एका इमारतीत जेवण बनविले जाते. त्यासाठी एक कर्मचारी आहे. ज्या ठेकेदाराकडून अन्नधान्य व अन्य किराणा साहित्य घेण्यात येते, त्या ठेकेदाराचे गेल्या काही महिन्यांपासून १५ लाखांचे बिल थकले आहे. त्यामुळे त्याने वेळोवेळी साहित्य पुरविण्यास नकार दिला; परंतु विनवण्या केल्याने तो पुरवठा पुन्हा सुरू ठेवला आहे. सरकारकडून अनुदान येत नसल्याने रुग्णकल्याण समितीमधून हा खर्च केला जातो; परंतु तेथूनही अत्यंत कमी मदत मिळत असल्याने पुरेसे व सकस जेवण देण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.


मोजून दिले जातात पदार्थ
दररोज रुग्णाला एकवेळच्या जेवणात कोणता पदार्थ किती वजनाचा असावा, याचे मानांकन ठरलेले आहे. भात ५५ ग्रॅम, भाकरी २०० ग्रॅम, भाजी १५० ग्रॅम, आमटी ५० ग्रॅम द्यावी, असे ठरलेले आहे; पण आता कोणी वजन करीत नाही. वाढणारा माणूस अंदाजे ताटात टाकतो. सकाळी छोटी एक पळी पोहे किंवा उप्पीट देण्यात येते. प्रत्येक बुधवारी मांसाहार देणे बंधनकारक असल्यामुळे त्या दिवशी दोन ते तीन फोडी तेही चिकनच असते. जादा भूक आहे म्हणून दुसऱ्यांदा मागायची येथे सोय नाही. जे दिलंय तेवढंच खायचं. पोट भरलं नाही, तर दुसऱ्या वेळच्या जेवणाची वाट बघत बसायचे त्यांच्या नशिबी आले आहे.

दोन दिवस उपाशी
सातत्याने थकबाकी असल्याने एकदा ठेकेदाराने धान्य पुरवठाच बंद केला. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात दोन दिवस रुग्णांना खायला अन्न मिळाले नाही. हातापाया पडून ठेकेदाराला साकडे घातल्यावर रुग्णांना जेवण मिळण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेंडा पार्कच्या शेतजमिनीत पिके घेतली जात होती. त्यामुळे भाजीपाला भरपूर मिळत होता. वेगवेगळी भाजी मिळत होती; पण मजुरांचे पगार थकल्याने त्यांनी काम करणे बंद केले आहे. त्यामुळे शेतात पीकही कुणी घेत नाही.

आहारात पौष्टिकता नाहीच..रोजच कोबी
या रुग्णालयात सध्या सात महिला व २३ पुरुष असे ३० रुग्ण वास्तव्यास आहेत. या सर्वांना दोनवेळचे जेवण, सकाळचा नाष्टा व चहा देण्यात येतो; परंतु त्याचा दर्जा अत्यंत खराब आहे. जो आहार दिला जातो, त्यातून नीट पोटही भरत नाही; त्यामुळे रुग्णांना अर्धपोटी राहावे लागत आहे. भाकरी, भाजी, भात, आमटी असे पदार्थ आहारात असतात; परंतु या आहारात विविधता नाही. दररोज केवळ कोबीची भाजी आणि डाळीची पातळ आमटी खाऊन रुग्णांना कंटाळा आला आहे. कोबीशिवाय त्यांना कोणतीही पालेभाजी अथवा कडधान्याची उसळ कधीच मिळत नाही; पण सांगायचं कुणाला? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

Web Title: Eating leprosy is not worth it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.