शाळी नदीसही प्रदूषणाचे ग्रहण
By Admin | Published: March 23, 2015 11:10 PM2015-03-23T23:10:16+5:302015-03-24T00:10:52+5:30
पाण्याला दुर्गंधी : दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
राजाराम कांबळे - मलकापूर शहराजवळून वाहणाऱ्या शाळी नदीच्या पाण्याचे प्रदूषण झाले आहे. शाळी नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे. पाण्याला उग्र वास येत असून, मलकापूर, उचत, माण, परळे कोपार्डे, येळाणे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठची शेतीही धोक्यात आली आहे. पालिकेची नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आली आहे. पालेश्वर धरणातील पाणी सोडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
उन्हाळ्यात पालेश्वर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी होतो. शाळी नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होतो. शाळी नदीवरील येळाणे येथे पाटबंधारे विभागाच्या वतीने पाणी अडविले जाते. नदीमध्ये मलकापूर शहरातील गटारींचे पाणी, उचत येथील गटारांचे पाणी मिसळते. त्यात नदीकाठावरील गावातील महिला नदीच्या पाण्यामध्ये कपडे धुतात. तसेच शेतकऱ्यांकडून जनावरेदेखील धुतली जातात. पाणी वाहत नसल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. पाण्याला उग्र वास येत असून, संपूर्ण नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे.
शाळी नदीतून दहा गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी विहीर व कूपनलिकांचा आधार घ्यावा लागत आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली असली तरी शेतीला या पाण्याशिवाय पर्याय नसल्याने काळ्या पाण्यामुळे शेती नापिक बनत आहे.
मलकापूर नगरपालिकेने या प्रदूषित पाण्यामुळे शाळी नदीवरील योजना बंद ठेवली आहे. कडवी नदीवरील जॅकवेलवरुन नागरिकांना फिल्टरचे पाणी पुरविले जाते. मात्र, खर्चासाठी नागरिकांना विहीर, कूपनलिका यांचे पाणी वापरावे लागते. शहरातील सर्व गटारींचे पाणी शाळी नदीत मिसळते. पालिकेने यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. प्रदूषण मंडळाने या नदीचे पाणी तपासून यावर उपाययोजना करावी व नदीकाठच्या गावांना प्रदूषित पाण्यापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी नदीकाठच्या गावातील नागरिकांतून होत आहे.
पाटबंधारे विभागाने पालेश्वर धरणातून नियमित पाणी सोडावे, तरच पाण्याचा प्रवाह सुरू राहून पाणी दूषित होणार नाही.
- बाबासाहेब पाटील, नगराध्यक्ष
शाळी नदीतील दूषित पाण्यामुळे नदीकाठची शेती धोक्यात आली आहे. पालिकेने उपाययोजना करावी.
- राजू प्रभावळकर, शेतकरी.