पर्यावरणपूरक गणेशोत्सव
By Admin | Published: September 22, 2015 12:41 AM2015-09-22T00:41:03+5:302015-09-22T00:59:23+5:30
गणरायास निरोप : ‘गणपती बाप्पा मोरया..ऽऽ पुढच्या वर्षी लवकर या..ऽऽ चा गजर
कोल्हापूर : यंदाच्या वर्षी पावसाने दिलेली ओढ, पाण्याचा गंभीर झालेला प्रश्न, जलप्रदूषण या सगळ््यांच्या दाहकतेचा विचार करून कोल्हापूरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. महापालिका, स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सोयीव्यतिरिक्त शहरातील गल्ली-बोळांमध्ये, कॉलन्यांमध्ये, बागेच्या ठिकाणी, चौका-चौकांत काहिलींची व्यवस्था करून जबाबदार आणि सुजाण नागरिकत्वाची प्रचिती दिली. पाच दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या ‘गणपती बाप्पा’ला सोमवारी जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. दुपारपर्यंत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम, गौरी-गणपतीची आरती, प्रसाद असे विविध कार्यक्रम झाल्यावर दुपारी चारनंतर भाविक गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडले. पाना-फुलांनी सजविलेल्या हातगाड्यांवर विविध गल्लीतल्या सगळ््या कुटुंबाच्या गणेशमूर्ती ठेवून त्यांनी वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जात होती. याशिवाय चार चाकी, ट्रॅक्टर, ट्रॉली सजवून त्यातून देखील गणेशमूर्ती पंचगंगा घाटावर विसर्जनासाठी आणल्या जात होत्या. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तर गंगावेश, पापाची तिकटी ते पंचगंगा घाट या परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती इतकी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. चिरमुऱ्यांची उधळण, आरती, टाळ््यांचा गजर, वाद्यांचा नाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ची आळवणी करत भाविक मूर्ती विसर्जनासाठी नेत होते. एवढेच नव्हे तर शहरात ठिकठिकाणी काहिलींची सोय करण्यात आल्याने त्या-त्या भागांतील नागरिक या काहिलीत गणेशमूर्तींचे विसर्जन करत होते. पंचगंगा नदीघाटासह राजाराम बंधारा, राजाराम तलाव, कळंबा तलाव, इराणी खण या ठिकाणी मोठ्या संख्येने गणेशमूर्ती दान केले जात होते.
संभाजीनगर तरुण मंडळाचा उपक्रम
मंगळवार पेठेतील छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळातर्फेगौरी-गणपतींच्या विसर्जनाची व्यवस्था मंडळाच्या परिसरात काहील ठेऊन केली होती.
या संस्था संघटनांचे परिश्रम
पंचगंगा नदीघाटावर अधिकाधिक गणेशमूर्ती व निर्माल्य दान व्हावे यासाठी पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या अंतर्गत विविध संस्था व संघटनांनी अथक परिश्रम घेतले. त्यात कोल्हापूर महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ज्योतिरादित्य इस्टेट डेव्हलपर्स, रेफ्रिजरेशन अॅड एअर कंडिशनिंग सर्व्हिसिंग, श्रीराम फौंड्री, रोटरी क्लब आॅफ गार्गीज, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, छत्रपती शाहू चॅरिटेबल ट्रस्ट, भटकंती युवा हायकर्स, गोलसर्कल मित्रमंडळ, अवनि, एकटी संस्था, कोल्हापूर हॉटेल-मालक संघ, शिवाजी विद्यापीठ, सुशितो एंटरप्रायजेस, शां. कृ. पंत वालावलकर कापड दुकान ट्रस्ट, सांगावकर अॅडव्हर्टायजर्स, महालक्ष्मी को-आॅपरेटिव्ह बँक, अखिल भारतीय नाट्यपरिषद, फेथ फौंडेशन, आर्किटेक्चर संस्था, इंडो काऊंट स्पिनिंग या संस्थांचा सहभाग होता.
निर्माल्याचा उपयोग खतासाठी..
पंचगंगा घाटावरील निर्माल्य अवनि संस्थेतर्फे खतनिर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी येथे फुले, पाने, कापसाचे वस्त्रमाळ, फळे, प्रसाद असे वेगवेगळे बॅरल करण्यात आले होते. याशिवाय जेथे एकत्रितरीत्या निर्माल्य टाकले जात होते तेथे कचरा वेचक महिला हे सगळे पदार्थ व निर्माल्य वेगवेगळे करत होते. निर्माल्य खतांसाठी व प्रसाद प्राणी-पक्षांना आणि प्लास्टिक विघटनासाठी पाठविण्यात येणार आहे.
न्यू पॅलेस, खासदार महाडिकांची गणेशमूर्ती दान
राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामीत्वाचा वारसा जपणाऱ्या छत्रपती घराण्याची न्यू पॅलेसची गणेशमूर्तीही पंचगंगा नदीघाटावर दान करण्यात आली. मानकऱ्यांनी पालखीतून गणेशमूर्ती येथे आणून ती कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केली. याशिवाय खासदार धनंजय महाडिक यांनीही आपली गणेशमूर्ती तीनवेळा नदीपात्रात बुडवून नंतर ती दान केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी परिसरात येऊन विसर्जनाची माहिती घेतली.
पंचगंगा घाटावर ६ हजारांहून अधिक मूर्ती दान
पंचगंगा नदीघाट हे मूर्ती विसर्जनाचे मुख्य केंद्र आहे. येथे भाविक ढोल-ताशा, हलगी, टाळ्यांचा नाद करत येत होते. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा घाट संवर्धन समितीने व्यापक मोहीम राबविली होती. त्याचा सकारात्मक परिणाम गणेशमूर्ती विसर्जनावेळी जाणवला. येथे समितीने गणेशमूर्तींच्या आरतीसाठी टेबलांची सोय केली होती. विसर्जनासाठी सहा कृत्रिम विसर्जन कुंड आणि पाच काहिली ठेवण्यात आल्या होत्या.
या सगळ््या सोयींमुळे, पावित्र्याची आणि स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली गेल्याने येथे भाविक स्वत:हून येऊन गणेशमूर्ती दान करत होते. या भाविकांना समितीच्यावतीने प्रमाणपत्र दिले जात होते. येथे रात्री आठ वाजेपर्यंत ६ हजार मूर्ती दान झाल्या होत्या. त्यात लहान-मोठ्या संस्था-संघटनांच्या मोठ्या गणेशमूर्तींचाही समावेश होता.
बावड्यात सात हजारांहून अधिक मूर्तिदान
रंगीत तालीम सुरू
घरगुती गणपतीचे विसर्जन झाल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळे आता देखाव्याच्या तयारीला लागली असून अनेक मंडळाच्या देखाव्याच्या रंगीत तालमीस आता सुरुवात झाली आहे. गुरुवार (दि. २४ )पासून बावड्यातील देखावे नागरिकांना पाहण्यासाठी खुले होणार आहेत.
रंकाळा वाचविण्याच्या हाकेला भरभरून प्रतिसाद
गणेशभक्तांचा पुढाकार : विसर्जनासाठी घेतला कुंड; काहिलींचा आधार
कोल्हापूर : रंकाळा तलावाला वाचविण्यासाठी सहकार्य करावे, या मनपा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. रंकाळा तलाव प्रदूषणातून मुक्त व्हावा, हा उद्देश काहीअंशी सफल झाला आहे. यंदा गणेशभक्तांनी विसर्जन कुंड, इराणी खण, त्याजवळील खण तसेच तलावाच्या सभोवती ठेवण्यात आलेल्या काहिलींत गणेशमूर्ती विसर्जित केल्या. रात्री आठ वाजेपर्यंत एक हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले; तर साडेतीन हजार मूर्ती दान करण्यात आल्या.
बहुतांश गणेशभक्तांनी तलाव, कुंड, काहिलींचा आधार घेत विसर्जन केले. साडेसात वाजेपर्यंत येथे साडेतीन हजार मूर्ती दान केल्या. तांबट कमान येथे असलेल्या विसर्जन कुंडावर गणेशभक्तांनी सकाळी,दुपारी दोन वाजल्यापासून मूर्ती विसर्जनासाठी गर्दी केली होती.
इच्छुक उमेदवारांची हजेरी
माजी नगरसेवक अजित राऊत, नगरसेवक उत्तम कोराणे, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, माजी नगरसेवक विक्रम जरग, इच्छुक उमेदवार सम्राट कोराणे, अजिंक्य चव्हाण, आदी मंडळी या ठिकाणी जातीनिशी हजर होती. पद्माराजे उद्यानाजवळ चंद्रकांत सूर्यवंशी या इच्छुक उमेदवाराने स्वखर्चाने निर्माल्य नेण्यासाठी ट्रकची सोय केली होती, तर इराणी खणीजवळ शारंगधर देशमुख व अन्य इच्छुक उमेदवार मूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते.
तीनशे मूर्त्या कुंभारांकडे
रंकाळा चौपाटी येथे हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. रात्री आठ वाजेपर्यंत दोन हजार मूर्ती दान केल्या. या ठिकाणी प्रतिष्ठानचे अशोक देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या घाटावरून कुंभार बांधवांना वेगवेगळ्या पॅटर्नच्या तीनशेहून अधिक मूर्ती दिल्या.
‘निसर्गमित्र’ माती परत देणार
‘निसर्गमित्र’ या संस्थेने यंदा २१०० इतक्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. त्या मूर्ती घेणाऱ्या गणेशभक्तांनी त्या आपल्या घरातच कुंडाची व्यवस्था करून विसर्जित केल्या. विसर्जित मूर्तींचे विघटन होऊन जमणारी माती संस्थेमार्फतच कुंभारबांधवांना परत केली जाणार आहे.