पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची भिस्त पर्यायी व्यवस्थेवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 01:32 PM2019-09-07T13:32:33+5:302019-09-07T13:35:14+5:30
पर्यावरणपूरक गणेशविसर्जनात राज्यात अव्वल क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर यंदा यंत्रणा उभी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामसेवकासह महसूल व ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर असल्याने विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकासह क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर पर्यायी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशविसर्जनात राज्यात अव्वल क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरजिल्हा परिषदेसमोर यंदा यंत्रणा उभी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामसेवकासह महसूल व ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर असल्याने विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकासह क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर पर्यायी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गेल्या १0 वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन हा लोकोत्सव व्हावा म्हणून प्रयत्न केले. गेल्या चार-पाच वर्षांत तर त्याला लोकचळवळीचेच स्वरूप आले. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी हातात हात घालून प्रत्यक्ष विसर्जन स्थळावर जाऊन लोकांना मूर्ती व निर्माल्य दान करण्यास प्रवृत्त करताना दिसले.
विसर्जनाआधी १५ दिवस याची पूर्वतयारी म्हणून बैठका, जनजागृती करण्यात आली. परिणामी तब्बल दोन लाख ६८ हजार इतक्या घरगुती, तर ७00 सार्वजनिक गणेशमूर्ती दान झाल्या. या उपक्रमाचे राज्यभर कौतुकही झाले; पण यावर्षी याचे नेमके उलटे चित्र दिसत आहे. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्यात आधीपासूनच अनास्था दिसत आहे.
ग्रामपंचायत व स्वच्छता विभागाने आपल्या परीने यंत्रणा लावली आहे; पण त्यांनाही मर्यादा येत आहेत. त्यातच ग्रामसेवकांनी तीन सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारपासून महसूल कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
आशाचेही कामबंद आंदोलन सुरू आहे. गावपातळीवर राबविणारी यंत्रणाच संपावर असल्याने काम करवून घ्यायचे कुणाकडून आणि सूचना, अहवाल मागवायचा कुणाकडून असा मोठा प्रश्न जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला पडला आहे.
परिणामी कोणत्याही धार्मिक भावना न दुखावता, कोणतेही जलस्रोत प्रदूषित होणार नाहीत, याची दक्षता घेऊन ग्रामपंचायत स्तरावर निर्माण केलेल्या विसर्जनाच्या पर्यायी व्यवस्थेचा आधार घेऊन गणेश विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.
१0२५ ग्रामपंचायतीत ४३८ खणीमध्ये ७१३ काहिलींची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य संकलनासाठी ३८९ ट्रॅक्टर-ट्रॉली व ७0४ घंटागाडींचे नियोजन केले आहे. तथापि, हे सर्व नियोजन कागदावरच आहे, प्रत्यक्षात काम करताना पर्यायी व्यवस्था किती राबते, यावरच जिल्हा परिषदेच्या पर्यावरणपूरक विसर्जन मोहिमेचे यशापयश अवलंबून आहे.