Ganpati Festival : कोल्हापूरातील ६३ कुटूंबांचे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 03:11 PM2020-08-26T15:11:28+5:302020-08-26T15:13:57+5:30

कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवाराकडून गतवर्षी घरगुती गणेश विसर्जन पर्यावरण पूरक करण्याचा अभिनव प्रयोग यावर्षी यशस्वी झाला.

Eco-friendly Ganesha: Successful immersion of eco-friendly Ganesha in 63 families in Kolhapur | Ganpati Festival : कोल्हापूरातील ६३ कुटूंबांचे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन यशस्वी

 कोल्हापूरातील निसर्गप्रेमी परिवाराने गतवर्षी कुंडीत पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करुन त्यात लावलेल्या आणि यंदा पूर्ण वाढ झालेली रोपे देवराईत जतन करुन ठेवली आहेत.

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूरातील ६३ कुटूंबांचे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन यशस्वीवनौषधींचे वृक्षसंवर्धन : जमिनीकडून घेतले, जमिनीला दिले, निसर्ग मित्र संस्थेचा पुढाकार

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवाराकडून गतवर्षी घरगुती गणेश विसर्जन पर्यावरण पूरक करण्याचा अभिनव प्रयोग यावर्षी यशस्वी झाला.

संस्थेने सुमारे ६३ कुटुंबांना बेल, सीता अशोक, कुंकू फळ, शेंद्री, पारिजातक, अंकोल, हुंब, हनुमान फळ, म्हाळुंगे, सोनचाफा, हिरडा, बेहडा, आवळा, शमी, कदंब, भद्राक्ष, काटेसावर इत्यादी विविध प्रजातीच्या वनौषधी गतवर्षी गणेश विसर्जनावेळी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली होती. या सर्व निसर्गप्रेमी भाविकांनी आपल्या आपल्या घरी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना केली होती.

गतवर्षी या कुटूंबांनी घरच्या गणेश मूर्तीचे आपल्या घराच्या परिसरात, अंगणातच, टप, बादलीतील पाण्यात विसर्जन केले होते. दुसऱ्या दिवशी ही माती कुंडीत भरून त्यामध्ये निर्माल्यापासूनच तयार केलेले खत घालून संस्थेने दिलेल्या रोपांचे संवर्धन केले. यावर्षी ही सर्व कुंडीतील पूर्ण वाढ झालेली रोपे सर्व भाविकांनी संस्थेकडे परत केली. या संपूर्ण उपक्रमात अनिल चौगुले, पराग केमकर, अभय कोटणीस, कमलाकर आरेकर, प्रकाश आरेकर, अस्मिता चौगुले यांनी मेहनत घेतली.

देवराईत वृक्षसंवर्धन

संस्थेने ही सर्व रोपे राधानगरी तालुक्यात कपिलेश्वर येथील स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून नव्याने आकारात येत असलेल्या एकविरा देवी देवराईत लागवडीसाठी देण्यात आली. येथील ग्रामपंचायतीच्यावतीने तातडीने वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करण्यात आले. त्यामुळे पर्यावरणपूरक सणउत्सव साजरे करण्याच्या निमित्ताने जमिनीकडून घेतले आणि जमिनीलाच परत दिले हे निसर्गचक्र पूर्ण केले.

गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन करा

कोरोनाचे संकट टाळण्यासाठी नदी, तलावांवर गर्दी न करता घरच्या घरीच पर्यावरणपूरक पद्धतीने आपल्या गणेशाचे विसर्जन करून पर्यावरणाला व कोरोनाचे संकट टाळण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहेत.


यावर्षीही संस्थेमार्फत असा पर्यावरणपूरक उपक्रम नव्या संकल्पनेतून राबवला जाणार आहे. त्यामुळे सर्वच निसर्गप्रेमी भाविकांनी घरातच पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करून निसर्ग संवर्धनात हातभार लावावा. ज्या भाविकांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तीची स्थापना केली असेल त्यांनीदेखील अमोनियम बायकाबोर्नेटचा वापर करून गणेशमूर्ती घरच्या घरीच विसर्जित करावी.
- अनिल चौगुले,
कार्यवाह, निसर्गप्रेमी परिवार, कोल्हापूर.

 

Web Title: Eco-friendly Ganesha: Successful immersion of eco-friendly Ganesha in 63 families in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.