लोंघेत पन्नास वर्षांपासून इको-फ्रेंडली गणेशोत्सव
By admin | Published: September 10, 2016 12:48 AM2016-09-10T00:48:39+5:302016-09-10T00:54:46+5:30
शाडूच्या मूर्ती बसविण्याचा गावकऱ्यांचा निर्णय : घरगुती, सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींना रंग नाही
चंद्रकांत पाटील --गगनबावडा
अलीकडे प्रदूषणप्रश्नी सर्वसामान्यांमध्येही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्यामुळे ‘इको-फ्रेंडली’ चळवळ तळागाळापर्यंत रूजू लागली आहे. पण गगनबावडा तालुक्यातील अख्खं गावच ‘इको-फ्रेंडली’ आहे हे सांगूनही पटणार नाही, पण असे गाव आहे. ते गाव म्हणजे लोंघे. लोंघेकरांची ही इको-फ्रेंडली परंपरा एक-दोन वर्षांची नव्हे तर तब्बल ५० हून अधिक वर्षांपासून सुरू आहे.
घरोघरी गणपतीची मूर्ती रंगीत न बसविता फक्त शाडूच्या मूर्ती बसविण्याचा निर्णय सर्व गावाने घेतला व आजपर्यंत परंपरा अखंडितपणे सुरू आहे. लोंघे गावचा आदर्श जिल्ह्याला मार्गदर्शक ठरला आहे. येथे घरोघरी व मंडळाच्या माध्यमातून गणपतीच्या रंगीत मूर्तीची प्रतिष्ठापना न करता शाडूच्या न रंगविलेल्या गणेशमूर्तीची पूजा केली जाते, हे एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
कोल्हापूरपासून अवघ्या २५ ते ३० कि. मी. अंतरावर कुंभी-कासारी काठावर हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाने संस्कृतीची परंपरा जपत अभिनव उपक्रम राबवला आहे. सेवाभावी संस्था, राज्य शासनाने दखल घ्यावी, असेच चांगले कार्य या गावाने केले आहे, याचे सर्व श्रेय जुन्या-जाणत्या वर्गालाच द्यावे लागेल, यात शंका नाही. अफाट दूरदृष्टी असलेल्या या जुन्या मंडळीनी गावाला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले असून त्याचे पालनही आजपर्यंत तरी चांगल्याप्रकारे होत आहे. गणेशोत्सवामुळे येथे कायम एकोपा नांदत आहे, हे या गावचे वैशिष्ट्य आहे. गावात गणेशाची मूर्ती पूर्णपणे चिखलमातीची बनविल्यामुळे कोणत्याही रासायनिक घटकांचा समावेश केलेला आढळून येत नाही. दोन महिने मातीसाठी प्रयत्न करूनही बनविलेल्या चिखलापासून मूर्तीची निर्मिती केली जाते. या मूर्ती नदी, विहिरींमध्ये विसर्जित केल्या तरी प्रदूषण होत नाही.
जलप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, जलप्रदूषण थांबले नाही तर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. असे असताना इतर गावांनी लोंघे गावचा आदर्श घेणे गरजेचे आहे. वास्तवत: रुढी परंपरा यांना धक्का न लावता पुरोगामी विचाराने ही परंपरा गावाने राखली असून शाडूच्या मूर्ती (न रंगविलेल्या) गावात निर्माण करून ग्रामस्थांनी आपल्या घरोघरी पूजन करून सर्वच गणेशभक्तांना एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.