कोल्हापुरात साजरी होणार पर्यावरणपूरक होळी

By admin | Published: March 11, 2017 04:40 PM2017-03-11T16:40:18+5:302017-03-11T16:40:18+5:30

होळीची शेणी स्मशानभूमीला दान

Eco-friendly Holi will be celebrated at Kolhapur | कोल्हापुरात साजरी होणार पर्यावरणपूरक होळी

कोल्हापुरात साजरी होणार पर्यावरणपूरक होळी

Next

कोल्हापुरात साजरी होणार पर्यावरणपूरक होळी
होळीची शेणी स्मशानभूमीला दान
कोल्हापूर : होळी सणानिमित्त कोल्हापूर शहरातील विविध मंडळांनी यंदाही उत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देत होळीची शेणी स्मशानभूमीला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून संयुक्त उपनगर समितीतर्फे सव्वा लाख शेणी, तर वांगी बोळमधील अचानक तरुण मंडळातर्फे ५१ हजार शेणी दान करण्यात येणार आहेत.
महापालिकेतर्फे पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प स्मशानभूमी येथे मोफत अंत्यसंस्काराची सुविधा आहे. दरम्यान, मोफत अंत्यसंस्कार सुविधेसाठी शेणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विविध संस्थांनी घेतला आहे. मोठ्या प्रमाणात होळी साजरी केल्याने वायू प्रदूषण होते तसेच रस्ते खराब होतात. हे टाळण्यासाठी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे अचानक तरुण मंडळाने म्हटले आहे. अचानक तरुण मंडळातर्फे गेली १५ वर्षे शेणी दान उपक्रम सुरू आहे. मंडळाचा यावर्षी ५१ हजार शेणी दान करण्याचा संकल्प आहे. उपनगरातील कार्यकर्ते, मंडळांनी एकत्र येत संयुक्त उपनगर उत्सव समिती स्थापन केली आहे. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीने एक लाख शेणी जमविण्याचा संकल्प केला. शुक्रवारअखेर एक लाख २५ हजार शेणी जमा झाल्या आहेत.
वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांसाठी 'अवनि'ची पोळी दानची साद
अवनि संस्थेमार्फत कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर येथे वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांसाठी आनंद शाळा चालविल्या जातात. दरवर्षी जवळपास ११०० मुले आनंद शाळेत शिकतात. या मुलांसाठी होळीची पोळी दान करण्याचे आवाहन अवनि संस्थेने केले आहे. संकलित केलेल्या पोळ्या कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर वीटभट्टीवरील आनंद शाळेतील मुलांना वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सामाजिक संस्था, शाळा व दानशूर व्यक्तींनी होळीची पोळी दान करावे. अवनि संस्था, जीवबा नाना जाधव पार्क, पुईखडी तसेच एकटी संस्था संचलित धागा रात्र निवारा रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, लक्ष्मीपुरी येथे जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. मोठी होळी केल्याने शहरातील डांबरी रस्ते खराब होऊन पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. शहरातील तरुण मंडळे, तालीम संस्था, सेवाभावी संस्थांनी होळी लहान करुन जास्तीत जास्त शेणी महापालिकेच्या स्मशानभूमीस दान करावे, दान केलेल्या शेणी महापालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प स्मशानभूमी येथे स्वीकारल्या जातील, असे आवाहन महापालिकेने शहरातील सर्व संस्थांना केले आहे.

Web Title: Eco-friendly Holi will be celebrated at Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.