पर्यावरणपूरक घर अधिक आनंददायी
By admin | Published: March 10, 2016 12:51 AM2016-03-10T00:51:27+5:302016-03-10T00:57:13+5:30
शिरीष बेरी : ‘बेस्ट आऊट आॅफ वेस्ट’ संकल्पनेवर स्लाईड शोच्या सहाय्याने माहिती
कोल्हापूर : कमीत कमी संसाधनाचा वापर, टाकाऊ वस्तूंचा वापर करून बांधलेल्या पर्यावरणाशी नाते जोडणारे घर अधिक आनंददायी असते, असे प्रतिपादन आर्किटेक्ट शिरीष बेरी यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आर्किटेक्टर विभागातर्फे बुधवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आपल्या ‘लय’ या पर्यावरणपूरक घराची माहिती व्याख्यानात दिली.
मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. गौरव विंचू, विद्यार्थी प्रतिनिधी रिंकेश गांधी , प्रसन्न वाझे प्रा. इंद्रजित जाधव, आदी उपस्थित होते.
आर्किटेक्ट बेरी म्हणाले, आजच्या युगात मानव निसर्गापासून दूर चालला आहे. त्याला पुन्हा निसर्गाकडे आकर्षित केले पाहिजे. शाश्वत विकास, निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास कसा होईल याकडे लक्ष देऊन घराची रचना करायला हवी. आपल्या अनेक सवयी बदलून आयुष्य सुखकर बनवू शकतो. नवीन घर बांधताना त्या इमारतीसाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू नव्या न वापरता आपल्या जवळपासच्या भागात मिळणाऱ्या जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करून कमीत कमी खर्चात नवी इमारत बांधता येते. मी आंदूर (जि. पुणे) येथे नव्या घराची रचना करताना भंगार बाजारातून आणलेल्या जुन्या सळई, पाडण्यात आलेल्या इमारतींच्या खिडक्या, दरवाजे, फरशी, कौलांचा वापर कलात्मकरीत्या केला.
ऊर्जेच्या वापराबद्दल ते म्हणाले, पावसाळ्यात पडणारे पाणी टाकीत साठवून ते वर्षभर पिण्यासाठी वापरता येते याचा प्रयोग मी घरी केला. तसेच सौरऊर्जेसाठी सोलर पॅनेलचा वापर करून त्यापासून मिळणारी ऊर्जा बॅटरीच्या सहायाने साठवून त्यावर घरातील एलईडी बल्ब प्रकाशित केले तसेच सोलर कुकरचा वापर अन्न शिजविण्यासाठी करतो.
दरम्यान, आर्किटेक्ट बेरी यांनी डिझाईन केलेल्या औद्योगिक, शैक्षणिक इमारती, हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेजस्ची माहिती स्लाईड शोच्या सहायाने दिली.
प्राचार्य डॉ. विजय घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आर्किटेक्टर विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)