कोल्हापुरात पर्यावरणपूरक विसर्जनास खो; पंचगंगा नदीत थेट मूर्ती विसर्जन, मूर्ती दान करण्याचाही राखला 'मान'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 11:50 AM2024-09-13T11:50:26+5:302024-09-13T11:50:53+5:30
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स हटविले
कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटावरील बॅरिकेड्स हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हटविल्याने गुरुवारी (दि. १२) नदीतील वाहत्या पाण्यात भक्तांनी मोठ्या प्रमाणावर मूर्ती विसर्जन केले. निर्माल्य दान चळवळीस मात्र चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिका आणि अवनि संस्थेच्या महिला दान केलेले निर्माल्य संकलित करीत होत्या. रात्री उशिरापर्यंत पंचगंगा घाटावर गणपती विसर्जनासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा अखंड जयघोष आणि पारंपरिक वाद्य, ढोल-ताशांचा गजर यामुळे नदी घाट दुमदुमून गेला होता.
प्रदुषणामुळे गेली अनेक वर्षे पंचगंगा नदीतील मूर्ती विसर्जन बंद झाले होते. त्यात महापालिका प्रशासन नदीत मूर्ती विसर्जनावर बंदीच घालत असल्याने प्रदूषण रोखण्यास मदत होती; परंतु यंदा निवडणुका असल्याने महापालिका व पोलिस प्रशासनानेही कोणतीच भूमिका घेतली नाही. लोक जे करतात ते करू दिल्याचे चित्र नदी घाटावर दिसले. परंतु त्यामुळे कष्टपूर्वक रुजलेली मूर्ती दान, पर्यावरणपूरक विसर्जनाची चळवळ मागे केली.
महापालिका आणि पोलिस प्रशासनाने नदी घाटावर बॅरिकेड्स लावून कृत्रिम कुंडातच भक्तांनी मूर्ती विसर्जन करावे आणि वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित करू नये, अशी व्यवस्था करण्यात आली होती. या नियोजनाप्रमाणेच विसर्जन होण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंदोबस्तासाठी थांबलेल्या पोलिसांच्या समोरच बॅरिकेड्स उचकटून नदीच्या दिशेने जाणारी वाट खुली करून दिली. प्रशासनाने यास कोणताही विरोध केला नाही. नंतर याच कार्यकर्त्यांनी घाट परिसरातील कृत्रिम कुंडही काढले. परिणामी भक्तांनी पंचगंगा नदीतील वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित केल्या. सकाळी नदीतील स्वच्छ असलेले पाणी सायंकाळी मूर्ती विसर्जनानंतर दूषित झाल्याचे दिसत होते.
महापालिकेची यंत्रणा हतबल
दान केलेल्या मूूर्ती आणि निर्माल्य एकत्रित करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी नदी घाटावर तैनात होते. पण मूर्ती दान करण्यासाठी काहिली किंवा कृत्रिम कुंड कोठेही नसल्याने वाहत्या पाण्यात मूर्ती सोडण्याची इच्छा नसणाऱ्या भक्तांची गैरसोय झाली. त्यांना नाइलाजास्तव वाहत्या पाण्यातच मूर्ती सोडाव्या लागल्या. बहुतांशी भक्तांनी स्वत:हून निर्माल्य दान केले. ते निर्माल्य संकलित करण्याची यंत्रणा महापालिकेने सक्षमपणे उभी केली होती.
घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी
नदी घाटाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. कुटुंबासह भक्त वाजत गाजत, गणरायाला निरोप देण्यासाठी घाटाकडे जात असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक भक्त चारचाकी, रिक्षातून गणपती विसर्जनासाठी आणल्याने वाहतूक कोंडीत भर पडत राहिली.
मूर्ती दान करण्याचाही राखला 'मान'
शहरातील रंकाळा तलावातील मुख्य कमानीजवळ भाविकांनी मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप दिला. या ठिकाणी दुपारपर्यंत मूर्ती विसर्जनासाठी गर्दी होऊ लागली. महापालिकेच्या वतीने या ठिकाणी विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली. परिसरातील राजे संभाजी तरुण मंडळाने विसर्जन कुंडाची व्यवस्था केली. संध्यामठाकडे विसर्जनासाठी जात असलेल्या भाविकांनी विसर्जन कुंडात मूर्तीचे विसर्जन करून मूर्तिदान उपक्रमाला प्रतिसाद दिला. महापालिकेच्या वतीने रात्री नऊ वाजेपर्यंत या ठिकाणाहून दोन हजारांहून अधिक गणेशमूर्ती दान करण्यात आल्या. त्यानंतर दहाहून अधिक ट्रॉलीतून निर्माल्य नेण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळी सहा नंतर मात्र या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी झाली.