पाऊसधारांत बाप्पाला पर्यावरणपूरक निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:33 AM2019-09-08T00:33:55+5:302019-09-08T00:34:00+5:30
कोल्हापूर : पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या धारा आणि पुराची टांगती तलवार सोसत कोल्हापूरकरांनी शनिवारी घरगुती गौरी-गणपतीला निरोप दिला. विधायक गणेशोत्सवाच्या ...
कोल्हापूर : पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या धारा आणि पुराची टांगती तलवार सोसत कोल्हापूरकरांनी शनिवारी घरगुती गौरी-गणपतीला निरोप दिला. विधायक गणेशोत्सवाच्या आदर्शांची पुनरावृत्ती करीत नागरिकांनी विसर्जन कुंडात गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. कोल्हापूर जिल्ह्यातून दोन लाख ३२ हजारांहून अधिक, तर शहरातून ५० हजारांहून अधिक अशा जवळपास तीन लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे काहिलीत विसर्जन झाले, तर १०० टक्के निर्माल्य दान झाले.
शनिवारी दुपारपासून पावसाने क्षणभरही उसंत घेतली नाही. मात्र धो-धो कोसळणारा पाऊसही गणेशभक्तांचा उत्साह कमी करू शकला नाही. पुन्हा महापुराची भीती आणि अतिवृष्टी सहन करीत नागरिक बाप्पांना निरोप देण्यासाठी बाहेर पडले. कोल्हापूर शहरात सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीघाटावर होते. मात्र शनिवारी सकाळी गायकवाड वाड्यापर्यंत आलेले पंचगंगेचे पाणी दुपारपर्यंत जामदार क्लबजवळ आल्याने यंदा नदीघाटावर नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करता आले नाही. त्यामुळे गायकवाड वाड्याजवळ विसर्जन कुंड ठेवण्यात आले. पंचगंगेला पूर आल्याने गणेशमूर्ती विसर्जनाचा भार यंदा रंकाळ्याने पेलला. जथ्थेच्या जथ्थे गणेशमूर्ती हातगाड्या, दुचाकी, चारचाकीतून व चालत घेऊन येत होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारी तुंबली. यासह राजाराम बंधारा, रंकाळा, इराणी खण, कळंबा, राजाराम तलाव, कोटीतीर्थ येथेही विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड आणि ट्रॅक्टर-ट्रॉलींची सोय करण्यात आली होती.