पर्यावरणपूरक ‘सोलर ड्रायर’, फळे-भाजी वर्गीकरण करणारे यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:27 PM2019-02-28T12:27:57+5:302019-02-28T12:36:53+5:30
पर्यावरणपूरक सोलर ड्रायर, फळे-भाजी वर्गीकरण करणारे यंत्र, वायरलेस वॉटर कंट्रोल मशीन, थ्रीडी इंटरनेट असे विज्ञान व तंत्रज्ञानाचे विविध प्रकल्प शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी बुधवारी सादर केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी लोककला केंद्रात विद्यार्थ्यांनी गर्दी केली.
कोल्हापूर : पर्यावरणपूरक सोलर ड्रायर, फळे-भाजी वर्गीकरण करणारे यंत्र, वायरलेस वॉटर कंट्रोल मशीन, थ्रीडी इंटरनेट असे विज्ञान व तंत्रज्ञानाचे विविध प्रकल्प शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी बुधवारी सादर केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी लोककला केंद्रात विद्यार्थ्यांनी गर्दी केली.
विद्यापीठातील स्कूल आॅफ नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, डॉ. ए. एम. गुरव, स्कूल आॅफ नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीचे समन्वयक डॉ. पी. एस. पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. नमिता खोत, सागर डेळेकर, आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन पाहण्यास विद्यापीठ, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
उद्घाटनानंतर प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी प्रदर्शनातील विविध प्रकल्पांची माहिती घेतली. प्रदर्शनात गोखले महाविद्यालयातील बी. एस्सी. तृतीय वर्षातील विद्यार्थी संचेत दळवी याने ‘अॅटोमेटिक वॉटर अँड सेव्ह वॉटर’ हा प्रकल्प सादर केला. त्यामध्ये त्याने स्वच्छतागृहातील पाणी वापरासाठी प्रेस कॉकच्या उपयोगाचे संशोधन मांडले. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील वैभव बागे याने ‘इकोफ्रेंडली सोलर ड्रायर’चे संशोधन सादर केले. त्यामध्ये पवन, सौरऊर्जा आणि जीओ कुलिंग सिस्टिमच्या वापरातून तयार केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
अंजली भोसले आणि प्रज्ञा कांबळे यांनी फूड प्रोसेस इंडस्ट्रिजसाठी उपयुक्त ठरणाऱ्या फळे, भाजी वर्गीकरण करणारे यंत्राचे संशोधन मांडले. त्यामध्ये उत्तम दर्जाची, चांगले आणि खराब अशा विभागांमध्ये फळे आणि भाजी यांचे वर्गीकरण केले जाते. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील एम. एस्सी. अभ्यासक्रमाच्या पांडुरंग गायकवाड याने घरातील पाणी व्यवस्थापनासाठीचे वायरलेस वॉटर लेव्हल कंट्रोल प्रकल्प सादर केला. या विभागातील अमोल माळी याने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी ‘स्मार्ट ब्लार्इंड स्टिक’ सादर केली. भित्तीपत्रकांच्या माध्यमातून थ्री-डी इंटरनेट, बुके पेपर, नॅनो मेडिसीन, आदींबाबतचे संशोधन, अभ्यासाची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
प्रयोगशाळा खुल्या
विज्ञान दिनानिमित्त विद्यापीठातील भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आदी विभागांतील सर्व प्रयोगशाळा विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. अन्य विभागांतील काही विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळांना भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली.