राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:45 AM2024-05-30T05:45:35+5:302024-05-30T05:46:27+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील ६६९ चौरस किलोमीटर परिसरात ही ८४ गावे आहेत

Eco tourism will increase in 84 villages of Radhanagari; MSRDC starts working on development plan | राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू

राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जैवविविधतेने नटलेल्या राधानगरी परिसरातील ८४ गावांमध्ये इको टुरिझमला चालना दिली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता एमएसआरडीसीकडून या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधण्यासाठी आचारसंहिता संपताच प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील ६६९ चौरस किलोमीटर परिसरात ही ८४ गावे आहेत. सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा भाग नयनरम्य आणि हिरवागार आहे. राधानगरी धरण, कलामवाडी धरण, त्यांचे बॅक वॉटर, अभयारण्य, धबधबे, जंगल आदींनी हा परिसर नटलेला आहे. तसेच ऐतिहासिक ठिकाणांची देणही या भागाला लाभली असून विपुल अशी जैवविविधता आहे. या माध्यमातून त्याचे संवर्धन, जतन आणि संरक्षण केले जाणार आहे. त्याचबरोबर या भागात पर्यटन आणि रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विविध सोयी सुविधा निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.

राज्य सरकारने या प्रकल्पासाठी एमएसआरडीसी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून गेल्यावर्षी नियुक्ती केली आहे. एमएसआरडीसीकडून या क्षेत्राचा भूवापर नकाशा बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून पुढील एक ते दोन महिन्यात हा नकाशा प्रकाशित केला जाणार आहे. लिडार सर्वेक्षणाच्या आधारे हे काम केले जात आहे. त्यानंतर एमएसआरडीसीकडून प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पर्यटनातून स्थानिकांना रोजगार

  • या भागातील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. त्यामध्ये जलसफारी, ट्रेकींग यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. 
  • याबरोबरच योगा, मेडिटेशन आणि आयुर्वेदिक पद्धतींनाही चालना देऊन त्याअनुषंगाने सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील. यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याअनुषंगाने या सेवा क्षेत्राला अनुरूप अशी विविध कौशल्ये आणि प्रशिक्षणे दिली जाणार आहेत. 
  • त्याच जोडीला स्थानिकांसाठी हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यासाठी केंद्रही सुरू करण्याचा विचार आहे. त्यामध्ये बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या उपक्रमाचाही विचार सुरू आहे.


विकास आराखड्यातील समाविष्ट बाबी

या समृद्ध परिसरातील वन्यजीव, गवे, तसेच वृक्षसंपदा यांचे संवर्धन, जतन आणि संरक्षण करणे, स्थानिकांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास साधणे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पर्यटन क्षमतेचा उपयोग करून त्याच्या वाढीला चालना देणे.

राधानगरी तालुक्यातील ८४ गावांचा बेस मॅप तयार करण्याचे काम सुरू आहे. आचार संहिता संपुष्टात आल्यानंतर प्रारुप विकास योजना तयार करण्याबाबतचा इरादा जाहीर केला जाईल. त्यानंतर विद्यमान जमीन वापर नकाशा आणि प्रारूप विकास योजना तयार करून नागरिकांच्या हरकती/ सूचनांकरिता प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप विकास योजनेत स्थानिक नागरिक, पदाधिकारी, तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी यांचीही मते विचारात घेतली जातील.
- अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

Web Title: Eco tourism will increase in 84 villages of Radhanagari; MSRDC starts working on development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.