सांगलीत शनिवारपासून ‘अर्थशास्त्र’ अधिवेशन
By Admin | Published: January 8, 2015 12:45 AM2015-01-08T00:45:24+5:302015-01-08T00:46:13+5:30
‘शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक’चे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक असोसिएशनचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन शनिवारी (दि. १०) व रविवारी (दि. ११) सांगलीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात होणार आहे. त्यात शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अर्थशास्त्राचे सुमारे दोनशे प्राध्यापक सहभागी होणार आहेत.या महाविद्यालयात शनिवारी सकाळी साडेदहा वाजता आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा.डॉ. जे. एफ. पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘जे.एफ. सर’ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. मराठी माध्यमातील आणि ४२५ पानांच्या या पुस्तकात डॉ. पाटील यांच्या आयुष्याचा आढावा घेण्यात आला आहे. या पुस्तकासह असोसिएशनच्या ‘शिवार्थ’ स्मरणिकेचेही प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलिंग्डन कॉलेजच्या माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सिंधुदेवी कोरे असतील. डॉ. पाटील यांच्यावरील पुस्तकाचे संपादन डॉ. कोरे आणि कमल पाटील यांनी केले आहे. अधिवेशनात शेतीजमिनीच्या वापरातील बदल आणि महाराष्ट्रातील पायाभूत संरचना या विषयावर
चर्चा होणार आहे शिवाय ४० जण याविषयांशी संबंधित शोधनिबंध सादर करणार आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजता अधिवेशनाचा समारोप होईल. (प्रतिनिधी)