ED Raid: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सीईओं’सह पाच अधिकाऱ्यांची तब्बल ७० तासांनंतर सुटका, ‘गोल्ड’ लोनचीही चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 04:11 PM2023-02-04T16:11:06+5:302023-02-04T16:11:43+5:30
कारभाराची दोन दिवस ‘ईडी’ने चौकशी करूनही बँकेच्या ठेवीत तब्बल २०० कोटींनी वाढ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह पाच अधिकाऱ्यांची काल, शुक्रवारी रात्री दहा वाजता मुंबईतील ईडी कार्यालयातून ७० तासांच्या चौकशीनंतर सुटका करण्यात आली.
ईडीच्या पथकाने बुधवार व गुरुवारी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह दोन शाखा व संताजी घोरपडे साखर कारखान्याची चौकशी केली. या कालावधीत बँकेचे कामकाज काहीसे विस्कळीत झाले होते. कारभाराची दोन दिवस ‘ईडी’ने चौकशी करूनही बँकेच्या ठेवीत तब्बल २०० कोटींनी वाढ झाली. चौकशी सुरू असतानाही कर्मचाऱ्यांनी बँकेचे कामकाज सुरळीत ठेवले, त्याचबरोबर ठेवीदारांनीही बँकेवरील विश्वास कायम ठेवला.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर व राजू खाडे यांना गुरुवारी सायंकाळी पुढील चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांना घेऊन पथक गुरुवारी रात्री दीड वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात पोहोचले. त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शुक्रवारी दिवसभरही त्यांच्याकडून जबाब नोंदवण्यात आला.
सायंकाळी पाचपर्यंत सोडतील, असे बँक वर्तुळात चर्चा होती. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्यांना सोडण्यात आले नव्हते. गुरुवारी रात्रीच बँकेच्या अधिकाऱ्यांपाठोपाठ कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी दिलीप लोखंडे, इंद्रजित घाटगे, अजित पाटील, संजय साबळे हे मुंबईला रवाना झाले. ते शुक्रवारी दिवसभर ईडी कार्यालयाच्या बाहेर थांबून होते.
‘गोल्ड’ लोनचीही केली चौकशी
जिल्हा बँकेकडे गोल्ड लोन किती आहे, त्यामध्ये अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचे किती आहे? याची चौकशीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे समजते.
‘ईडी’चे अधिकारी फेराखाली झोपायचे, मात्र...
बुधवारी रात्रभर चौकशी सुरू असताना ‘ईडी’चे अधिकारी दोघे-दोघे जाऊन झोपायचे व पुन्हा तपासणीसाठी यायचे. मात्र, बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांना हलू दिले नसल्याचे सांगण्यात आले.
पोलिस बंदोबस्तात जेवण
मुंबईला नेलेल्या पाच अधिकाऱ्यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयातून दोघादोघांना पोलिस बंदोबस्तात जेवणासाठी बाहेर आणले होते.
बँकेच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद
चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांचे फोन गुरुवारपासून बंद करण्यात आले आहेत. त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ देत नसल्याने त्यांच्या कुटुंबांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.