कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्याला हदयविकाराचा झटका, 'ईडी'च्या ३० तासाच्या चौकशीत होता समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 05:59 PM2023-02-03T17:59:18+5:302023-02-03T18:01:29+5:30
आज शुक्रवारी ईडीच्या या कारवाईविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी एक तास काम बंद आंदोलन करून निषेध केला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेचे अधिकारी सुनील लाड यांना हदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ईडीच्या पथकाने जिल्हा बँकेत टाकलेल्या छाप्यात तब्बल तीस तास तपासणी केली. या चौकशीत लाड यांचा समावेश होता.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या पथकाने काल, गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांना पोलिस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आले. ईडीने तब्बल ३० तास ‘ब्रिक्स’ व ‘ संताजी घोरपडे’ साखर कारखान्याशी संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी करण्यात आली. सलग ३० तास चौकशी सुरू राहिल्याने अधिकाऱ्यांना झोप नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. डॉ. ए. बी. मानेंसह सर्वच अधिकरी व कर्मचाऱ्यांचे डोळे सुजले होते.
दरम्यान, ईडीच्या पथकाने बँकेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले होते. कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना बाहेर नेण्यास विरोध केला. तर, आज शुक्रवारी ईडीच्या या कारवाईविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी एक तास काम बंद आंदोलन करून निषेध केला.