शिक्षण विभागाचा निर्णय : २६ जूनअखेर विशेष अभियान; प्रवेश क्रमांकाशी जोडणार
By admin | Published: April 22, 2015 11:43 PM2015-04-22T23:43:00+5:302015-04-23T00:29:18+5:30
प्रत्येक बालकाचे आधार कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना आधार कार्डशी जोडण्यात येतील.
भीमगोंडा देसाई -कोल्हापूर
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास आधार कार्ड देण्यासाठी २७ एप्रिल ते २६ जूनअखेर विशेष अभियान राबविण्याचा आदेश मंगळवारी अप्पर सचिव बी. आर. माळी यांनी काढला आहे. प्रवेश क्रमांकाशी जोडून शाळाबाह्य मुलांचा नेमकेपणाने शोध घेण्यासाठी आधार कार्डची मदत घेतली जाणार आहे. विशेष बैठक बोलावून ८ मे रोजी गावातील शंभर टक्के बालकांचे आधार कार्ड तयार करण्याचा संकल्प करून ग्रामस्थांना प्रतिज्ञा दिली जाईल
समाजातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचे धडे घेतल्याशिवाय शिक्षण हक्क कायद्याचा मुख्य हेतू सफल होणार नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापूर्वी शिक्षण प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले. मात्र,नेमकेपणाने शाळाबाह्य मुलांची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाने आता शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रवेश क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आधार कार्ड देण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे.
शिक्षणाधिकारी यांनी शाळानिहाय किती विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीत, त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याची सूचना दिली आहे. ज्या दिवशी शाळेत, वॉर्डात, गावात आधार कार्डसाठी आवश्यक व्यवस्था केली आहे, त्याच्या आदल्या दिवशी संबंधित विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकास माहिती देण्याची जबाबदारी शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सोशल मीडिया, वृत्तपत्र, दवंडी, प्रचारपत्रके, या माध्यमातून व्यापक जागृती होणार आहे. २७ एप्रिलपासून अभियानाला प्रारंभ होईल. २ मे अखेर गटशिक्षणाधिकारी यांनी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची नावे देणे, ३ ते ४ मे अखेर गावनिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देणे, ५ रोजी जिल्हास्तरावर, तर ६ रोजी बैठक घेऊन नियोजन करणे, ७ रोजी गावपातळीवर आधार कार्डचे नियोजन जाहीर करणे, ८ रोजी गावातून फेरी काढून जागृती करणे, अशी अंमलबजावणी केली जाणार आहे. २६ जूनपर्यंत आधार कार्ड देऊन प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे.
प्रतिज्ञा अशी
प्रत्येक बालकाचे आधार कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना आधार कार्डशी जोडण्यात येतील. त्याचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घेता येईल, याची आम्हाला जाणीव आहे. आधार कार्डाच्या क्रमांकाशी शाळेतील प्रगती यंत्रणा जोडल्यामुळे कोणता विद्यार्थी काय, किती शिकत आहे, याचीही माहिती होईल. आधार कार्डमुळे विद्यार्थी संलग्न झाल्याने शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी शाळेशी जोडलेला राहील. शाळाबाह्य होणार नाही.