शिक्षण विभागच म्हणतोय, नोकरीची नाही हमी

By admin | Published: June 18, 2015 12:28 AM2015-06-18T00:28:07+5:302015-06-18T00:36:39+5:30

पालक-विद्यार्थी संभ्रमात : ‘डीईलएड्’कडे ओढा कमी; अध्यापक विद्यालये पडत आहेत ओस

Education Department says no job guarantee | शिक्षण विभागच म्हणतोय, नोकरीची नाही हमी

शिक्षण विभागच म्हणतोय, नोकरीची नाही हमी

Next

रजनीकांत कदम - कुडाळ -मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त असल्याने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम डीईलएड् अर्थात डीएड् करणाऱ्यांना नोकरीची हमी नसल्याचे शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमाच्या माहिती पुस्तकावरच नमूद केले आहे. यामुळे विद्यार्थी, पालक व विद्यालय चालक संभ्रमावस्थेत आहेत. त्याचप्रमाणे या अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेणाऱ्यांचा ओढाही कमी झाल्याचे दिसत आहे
काही वर्षांपूर्वी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डी.एड्. अर्थात शिक्षणसेवक होण्याच्या दृष्टीने डी.एड् कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचे. आता मात्र शिक्षणसेवक भरती मोठ्या प्रमाणात होत असल्याने डी.एड् अभ्यासक्रमाकडे प्रवेश होत नसल्याने ‘डी.एड्.’ला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने अध्यापक विद्यालयेही ओस पडत आहेत. यंदापासून शिक्षण विभागाने या प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या (ऊ.ळ.ए)ि प्रवेशासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व मान्यताप्राप्त डी.एड् कॉलेजमध्ये १ जूनपासून अर्ज विक्री सुरू व स्वीकृती १६ जूनपर्यंत शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
दरम्यान, याही वर्षीचा अभ्यासक्रमाचा अर्ज आहे, परंतु यंदा अर्जाच्या शेवटी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांना नोकरी मिळेलच असे नाही. कारण राज्यात शिक्षणसेवक प्रतीक्षा यादीत आहेत, असे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.


‘आमचे अर्ज देण्याचे काम’
याबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य जे. डी. मेटे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, अर्जामध्ये काय असावे, याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे आणि शिक्षण विभाग निर्णय घेत असतो. याबाबत आम्ही भाष्य करू शकत नाही. आम्ही केवळ अर्ज देण्याचे
आणि स्वीकृतीचे काम करतो, असे स्पष्ट केले.
आवाज उठविणार : गाळवणकर
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे संचालक उमेश गाळवणकर म्हणाले, डी.एड्.च्या प्रवेश अर्जावर नोकरी मिळण्याची हमी नाही, असे विधान लिहिले गेल्याची घटना ४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असून, ही गोष्ट निषेधार्थ आहे. नोकरीची हमी नाही, तर प्रत्येक अभ्यासक्रमाच्या अर्जावर शासनाने नोकरी मिळणार की नाही, हे लिहिले पाहिजे. एकंदरीत पाहता, अशा प्रकारची कृती शिक्षण विभागाला शोभनीय नाही. याच्या विरोधात संस्थेच्यावतीने आवाज उठविणार आहे.
राज्यात सात लाख
शिक्षणसेवक बेरोजगार
राज्यात एकूण १ हजार ४०५ (शासकीय व विना अनुदानितसह) अध्यापक विद्यालये असून यामधून वर्षाला ६८ हजार विद्यार्थी शिक्षणसेवक म्हणून बाहेर पडतात. वर्षाला १० ते १५ हजार शिक्षकांची राज्यात गरज असते. त्यामळे २०१० ते २०१४ पर्यंतची आकडेवारी पाहता राज्यात ७ लाख शिक्षकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
‘सतर्क करण्यासाठी’
हा अभ्यासक्रम पूर्ण केला, तरी अगोदरच राज्यात ७ लाख बेरोजगार आहेत. तसेच शिक्षक भरतीही बंद आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी शासनाकडे तगादा लावू नये, याकरिता विद्यार्थ्यांना सतर्क करण्यासाठी हा शासनाने योेजिलेला उपाय असल्याची माहिती मिळते.

अभ्यासक्रमच बंद करायचा आहे का?
सध्या डी.एड्. प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी फिरविलेली पाठ, बेरोजगार शिक्षण सेवकांची वाढलेली मोठी संख्या यामुळे
ही पदविका घेऊ नका, असे
सांगून हा अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातला आहे का, अस प्रश्न जनतेत व विद्यार्थ्यांना पडला आहे.
डी.एड्. अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्याला नोकरीच्या हमीबाबत शाश्वती नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले असून, आता प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जात शिक्षण विभाग नोकरी मिळणार अथवा नाही, याबाबत उल्लेख करणार का, असा सवाल विचारला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०१० पूर्वी एका वर्षात बारा अध्यापक विद्यालयातून सुमारे ५७७ विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडायचे. मात्र, २०१० पासून ्र राज्यात शिक्षक भरती परीक्षा झालेली नाही.

Web Title: Education Department says no job guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.