वाचन संस्कृतीमुळेच शैक्षणिक वातावरण समृध्द : गायकवाड, राजर्षी शाहू ग्रंथालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 11:28 AM2020-03-10T11:28:44+5:302020-03-10T11:30:20+5:30
व्यापक ग्रंथप्रसार आणि वाचन संस्कृतीमुळेच राज्यातील शैक्षणिक वातावरण खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्य महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी केले.
कोल्हापूर : व्यापक ग्रंथप्रसार आणि वाचन संस्कृतीमुळेच राज्यातील शैक्षणिक वातावरण खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्य महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात नव्याने सुरुवात केलेल्या राजर्षी शाहू ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ होते.
गायकवाड म्हणाले, ग्रंथदानातून वाचन संस्कृती वाढणार असून, त्यातूनच शैक्षणिक विकास होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघाला सक्षम होण्याची आवश्यकता आहे.
ग्रंथदान उपक्रमाबाबत मिलिंद पांगिरेकर यांनी माहिती दिली. प्राचार्य जीवन साळोखे यांनी ग्रंथालय स्थापनेचा उद्देश सांगितला. दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक केले. संघाचे व्हा. चेअरमन बी. आर. बुगडे यांनी आभार मानले. डी. एस. लवटे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी महामंडळाचे आजीव सदस्य डी. एस. पाटील, उपाध्यक्ष आर. डी. कुंभार, सदस्य एस. वाय. पाटील, शिवाजीराव कोरवी, एम. आर. पाटील, जे. आर. समुद्रे, जी. ए. पाटील, के. बी. ठोंबरे, एस. एस. खोचरे, एन. एस. घोरप, एस. एस. देवेकर, आदी उपस्थित होते.
३०० पुस्तके भेट....
याप्रसंगी ग्रंथालयासाठी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, जयश्री दानवे, अशोक पाटील यांच्यासह संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्यांनी सुमारे ३०० पुस्तके भेट दिली.