भूमी अभिलेखच्या लिपिकाला शिक्षा
By Admin | Published: June 26, 2015 12:55 AM2015-06-26T00:55:17+5:302015-06-26T00:55:17+5:30
पन्हाळा कार्यालय : चार हजारांची लाच प्रकरण
कोल्हापूर : शेतजमिनीच्या मोजणीसाठी चार हजार रुपयांची लाच घेतल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने भूमी अभिलेख पन्हाळा कार्यालयातील लिपिक राजेंद्र केशवराव बिडकर (वय ४१) याला एक वर्ष सक्तमजुरी व चार हजार रुपये दंड तसेच कलम सातखाली सहा महिने सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायाधीश के. डी. बोचे यांनी गुरुवारी सुनावली. दरम्यान, बिडकर याने दंडाची रक्कम भरून वकिलातर्फे जामीन दिल्याने न्यायालयाने त्याची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.
अधिक माहिती अशी, अरविंद रघुनाथ पाटील (रा. फुलेवाडी) यांची वडिलोपार्जित चार गुंठे जमीन पन्हाळा येथे आहे. त्यामध्ये त्यांनी सागवान व निलगिरीची झाडे लावली आहेत. त्यांच्याशेजारी संजय शामराव पाटील यांचीही चार गुंठे जमीन आहे. या जमिनीची संजय पाटील यांनी २२ एप्रिल २००६ रोजी बिडकर याच्याकडून मोजणी करून घेतली होती. त्यावेळी बिडकर याने अरविंद यांच्या भावास ‘तुम्ही संजय पाटील यांच्या जागेत अतिक्रमण केले आहे; त्यामुळे त्यांच्या जागेतील झाडांवर तुमचा कोणताही अधिकार नाही,’ असे सांगितले. त्यामुळे अरविंद यांनी मोजणी चुकीची असल्याने पुन्हा करण्यासाठी तालुका निरीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, पन्हाळा यांच्याकडे २५ एप्रिल २००६ रोजी अर्ज सादर केला. त्यानंतर मोजणीची चौकशी करण्यासाठी ते गेले असता बिडकर याने मोजणी बरोबर असल्याचे सांगितले. त्यानंतर १७ मे २००६ रोजी बिडकर याने फोनवरून पाटील यांना वाघबीळ येथे बोलावून मोजणी पहिल्यासारखीच ठेवण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली. पाटील यांनी या प्रकरणी लाचलुचपत विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक एच. बी. वाकडे यांच्याकडे तक्रार केली. पथकाने २३ मे २००६ रोजी पाटील यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना बिडकर याला रंगेहात पकडले. पोलीस उपअधीक्षक वाकडे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात सरकारतर्फे वकील दिलीप मंगसुळे यांनी एकूण चार साक्षीदार तपासले. (प्रतिनिधी)