आदित्यच्या बालबुद्धीमुळे पक्षाची वाट लागली, दीपक केसरकरांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 11:34 AM2023-06-30T11:34:33+5:302023-06-30T11:36:12+5:30
‘संजय राऊत यांच्याबद्दल बोलून तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवायला नको,’
कोल्हापूर : केवळ बालबुद्धीमुळे पक्षाची वाट लागली, असा टोला शालेय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी येथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना लगावला. ‘संजय राऊत यांच्याबद्दल बोलून तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवायला नको,’ अशीही शेरेबाजी त्यांनी यावेळी केली.
केसरकर पंढरपूरला विठ्ठलदर्शन करून कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कामत उपस्थित होते. केसरकर म्हणाले, यंदा पहिल्यांदाच वारकऱ्यांचे दर्शन सुरू ठेवून मुख्यमंत्र्यांनी वि्ठ्ठलदर्शन घेतले. पंढरपूरच्या विकासासाठी निधी दिला. वारकऱ्यांना बाटलीबंद पाणी दिले. सर्वांसाठी उपलब्ध असणारे असे हे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी येणारी विधानसभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे जाहीर केले असल्यामुळे आणि हे दोन्ही नेते समजूतदार असल्याने काहीही अडचण येणार नाही.
कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर येणार म्हणूनच मोर्चाचे नियोजन केले गेले. जी कंपनी पुण्यात ब्लॅकलिस्ट होते, ती मुंबई महापालिकेला चालतेच कशी? लोकांच्या जिवाशी खेळण्याचा हा सर्व प्रकार होता. समान नागरी कायदा झाला पाहिजे, हीच भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती. याबाबत केंद्र सरकार काही निर्णय घेत असेल आणि त्यातून सर्वांना समान न्याय मिळत असेल तर त्याला विरोध करण्याचे काहीही कारण नाही, असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
पवारांनी स्वाभिमानामुळेच उठाव केला
शरद पवार यांचे खच्चीकरण करण्याचा कॉंग्रेसकडून सातत्याने प्रयत्न सुरू होता; म्हणूनच स्वाभिमानाने शरद पवार यांनी कॉंग्रेसविरोधात उठाव केला. आमचाही पक्ष संपवण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू होता; म्हणूनच आम्हीही उठाव केला. त्यामुळे पवारांचा ‘उठाव’ आणि आमची ‘गद्दारी’ असे म्हणता येणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.