शिक्षण तिसरी अन् आॅनलाईन गंडा २२ लाखांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:49 PM2019-07-15T13:49:19+5:302019-07-15T13:51:53+5:30
शिक्षण अवघे तिसरीपर्यंतचे अन् दिल्लीत बसून आॅनलाईनवरून कोल्हापूरच्या व्यापाऱ्यास २२ लाखांचा गंडा घातला. अशा बहाद्दरास लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिल्लीत जाऊन ताब्यात घेतले अन् रविवारी अटक केली. अजय गंगादास दास (वय २२, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. कर्जाचे आमिष दाखवून आॅनलाईनवरून विविध खात्यांवर पैसे टाकण्यास भाग पाडून संभाजीनगरातील गजानन भोसले (वय ६३) यांची ही फसवणूक झाली आहे, त्यांनीच लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
कोल्हापूर : शिक्षण अवघे तिसरीपर्यंतचे अन् दिल्लीत बसून आॅनलाईनवरून कोल्हापूरच्या व्यापाऱ्यास २२ लाखांचा गंडा घातला. अशा बहाद्दरास लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिल्लीत जाऊन ताब्यात घेतले अन् अटक केली. अजय गंगादास दास (वय २२, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. कर्जाचे आमिष दाखवून आॅनलाईनवरून विविध खात्यांवर पैसे टाकण्यास भाग पाडून संभाजीनगरातील गजानन भोसले (वय ६३) यांची ही फसवणूक झाली आहे, त्यांनीच लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, गजानन भोसले (वय ६३) हे प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना व्यवसायासाठी कर्जाची गरज होती. त्याबाबत आलेली जाहिरात वाचून त्यांनी सौभाग्य फायनान्स कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांना गोरख शर्मा नावाच्या व्यक्तीने प्रकल्प अहवाल पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना आठ कोटी ४० लाखांचे कर्ज मंजुरीचे पत्रही दिले.
कर्जासाठी विविध प्रकारचे चार्जेस म्हणून १३ डिसेंबर २०१७ ते २ जुलै २०१८ कालावधीत तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यांवर २२ लाख ३७ हजार ९८० रुपये पाठविण्यास सांगितले. पैसे देऊनही कर्ज मंजूर होत नसल्याने भोसले यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली, त्यानंतर त्यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.
दरम्यान, गुन्ह्यातील संशयितांना दिल्लीत जाऊन शोधण्यासाठी प्रवास खर्च म्हणून भोसले यांच्याकडे २५ हजारांची लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचून संशयित हेड कॉन्स्टेबल अजिज शेख व चहा टपरीचालक दाऊद पाटणकर यांना दि. २४ जूनला पकडले होते.
हॉटेलमध्ये वेटरचे काम
आठवड्यापूर्वीच लक्ष्मीपुरीतील पथक दिल्लीला रवाना झाले. त्यांनी या प्रकरणातील संशयित अजय दास यास ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणले. रविवारी रात्री त्याला अटक केली. प्राथमिक तपासात तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता, तसेच त्याचे शिक्षण इयत्ता तिसरीपर्यंत झाले असल्याची माहिती पुढे आली.