शैक्षणिक गुणवत्ता वाढणार, ताण कमी होणार!

By admin | Published: June 20, 2014 12:59 AM2014-06-20T00:59:57+5:302014-06-20T01:08:52+5:30

सुवर्णमहोत्सवातील मंजूर पदे : शिवाजी विद्यापीठात १५५ पदांची ‘मेगा भरती’

Education will increase, stress will be reduced! | शैक्षणिक गुणवत्ता वाढणार, ताण कमी होणार!

शैक्षणिक गुणवत्ता वाढणार, ताण कमी होणार!

Next

संतोष मिठारी ल्ल कोल्हापूर
शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागांतील कामकाजात अडथळा ठरलेल्या रिक्तपदांच्या भरतीला शिवाजी विद्यापीठात प्रारंभ झाला आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर संवर्गातील १५५ पदांच्या भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पदांची पूर्तता झाल्याने विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार असून, प्रशासकीय कामकाजातील ताणदेखील कमी होणार आहे.
अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये मिळणाऱ्या संधी तसेच सेवानिवृत्तीमुळे विद्यापीठातील रिक्त पदांमध्ये वर्षागणिक भर पडत आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेसह प्रशासकीय कामकाजावर होत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी विद्यापीठातील रद्द (लॅप्स्) झालेल्या २१७ पदांमुळे संबंधित परिणाम अधिक जाणवू लागला. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने रिक्त पदांच्या भरतीचा मुद्दा हाती घेतला. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाकडे शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील पदांच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला. त्याला शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार शिक्षक संवर्गातील ६० आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ३६ पदांच्या भरतीची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. शिक्षकांमध्ये विद्यापीठातील कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आदी विद्याशाखांमधील पदांचा समावेश आहे. तसेच भांडारपाल, लॅब अस्टिटंट, अधीक्षक, डाटा एंट्री आॅपरेटर, शिपाई यांचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांमध्ये समावेश असून त्यात तीन अधिकाऱ्यांचीदेखील पदे आहेत. शिक्षकांच्या १८ पदांच्या मुलाखतीची प्रक्रिया झाली आहे. शिक्षकेतरमधील ३० पदे यावर्षी भरली जाणार असून त्यातील निम्म्या पदांची लेखी परीक्षा आहे. भरती प्रक्रिया सुरू असलेली अधिकतर पदे ‘सुवर्णमहोत्सवा’तील आहेत. विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग, संगणकशास्त्र विभाग आदी विभागांमधील पदे विद्यापीठ फंडातून भरली जाणार आहेत. भरती प्रक्रिया टप्प्या-टप्याने केली जात आहे. रिक्त पदांच्या भरतीमुळे विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची स्थिती सुधारण्यास हातभार लागणार आहे.

Web Title: Education will increase, stress will be reduced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.