शिक्षण, महिला बालकल्याण, दलित वस्ती निधीवरून चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 08:06 PM2021-03-23T20:06:32+5:302021-03-23T20:10:00+5:30
Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या सभेत प्राथमिक शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग आणि दलित वस्तीच्या निधीवरून चकमक उडाली. या सभेत एकीकडे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सत्तारूढ सदस्यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी थोडे नमते घेण्याचा प्रयत्न केला. याला अपवाद फक्त समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांचा होता.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या सभेत प्राथमिक शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग आणि दलित वस्तीच्या निधीवरून चकमक उडाली. या सभेत एकीकडे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सत्तारूढ सदस्यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी थोडे नमते घेण्याचा प्रयत्न केला. याला अपवाद फक्त समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांचा होता.
नेहमीप्रमाणे राजवर्धन निंबाळकर यांनी कोरोना खरेदी, संगणक खरेदी, शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न मांडून अधिकाऱ्यांचीही कोंडी केली. कोरोना काळातील खरेदीची कॅगमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आण्णाभाऊ साठे यांची पुस्तके वितरित करण्याचे ठरले असताना त्यातून झेॅराक्स मशिन्स का घेतला अशी विचारणा केली.
भुदरगडच्या सभापती कीर्ती देसाई यांनी यावेळी पदाधिकारी आणि महिला बालकल्याण अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. गेले काही महिने भुदरगड पंचायत समितीची बदनामी होत असताना यामध्ये का लक्ष घातले नाही, अधिकाऱ्यांना पाठीशी घालता का अशी विचारणा त्यांनी केली. त्यांना रोहिणी आबिटकर यांनी साथ दिली. त्यांच्यापुढे सोमनाथ रसाळ यांना उत्तर देणेही अवघड झाले. यावेळी विजय भोजे यांनीही रसाळ यांना सभागृहात बोलताय, जबाबदारीने बोला असे सुनावले.
दलित वस्तीच्या निधीवरून आकांक्षा पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेतली. कुठल्या आधारे आणि कसे वाटप झाले अशी विचारणा त्यांनी समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांना केली. त्यावेळी विरोधी सदस्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. तेव्हा सभापती स्वाती सासने यांनी तुमच्यावेळी जसा निधी दिला तसाच दिला असे गोंधळाच सांगितले. यावेळी बोलणाऱ्या सुभाष सातपुते यांना इंगवले यांनी रोखले.