वाघजाई स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
By admin | Published: April 16, 2015 10:25 PM2015-04-16T22:25:28+5:302015-04-17T00:15:16+5:30
वर्चस्व वादातून संस्थापकच बेदखल : दहावीच्या मुलांची पहिली बॅच कशीबशी पडली बाहेर; संस्थापक ख्रिस्तोफर जॉन्सन यांच्यावर शाळा सोडण्यासाठी दबाव
प्रकाश पाटील - कोपार्डे -दहा वर्षांपूर्वी कोपार्डे (ता. करवीर) येथे ख्रिस्तोफर जॉन्सन यांनी गायडेस्ट अंतर्गत वाघजाई ग्रीन हिल्स इंग्लिश स्कूलची स्थापना केली. इंग्रजी शिक्षण, शिस्त व आधुनिकतेचा अंगीकार मुलांना मिळत असल्याने परिसरातील पालकांनी मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतून काढून वाघजाई इंग्लिश स्कूलमध्ये घातली. मात्र, या शाळेला शासन मान्यता मिळविण्यासाठी येत असलेल्या अडचणींबरोबर आर्थिक अडचणी पेलवणाऱ्या नसल्याने संस्थापकांनी अनेक पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पर्यायातून त्यांना शाळा चालविण्यासाठी सुनियोजित मार्गच सापडला नसल्याने आज या शाळेत शिकणाऱ्या ४५० ते ५०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
जॉन्सन यांनी शासन मान्यता मिळेल, या आशेवर कोपार्डे येथील एका छोट्या इमारतीत वाघजाई ग्रीन हिल्स इंग्लिश स्कूलची स्थापना केली. केजी नर्सरीपासून सुरुवात झाल्यानंतर शिक्षणाचा दर्जा व इंग्रजी शाळेचे ग्रामीण पालकांत असणारे फॅड त्याचबरोबर इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शहरी शाळांपेक्षा असणारी कमी फी यामुळे पालकवर्ग आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याऐवजी या शाळेत प्रवेश घेऊ लागले. संस्थापक जॉन्सन यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी वारंवार प्रयत्न केले. या शाळेच्या मान्यतेसाठी जिल्हा परिषदेकडून मूल्यांकनही झाले. मात्र, आज तागायत त्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मान्यता दिली गेली नाहीच.
वाघजाईला मान्यता मिळेल, या आशेवर पालकांनी आपली मुले दाखल केली आहेत. यावर्षी दहावीची पहिली बॅच बाहेर पडली आहे. आज शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ४५० ते ५०० च्या वर असून, ती चालवायची कशी या विवंचनेतून संस्थाचालकांनी विविध पर्याय शोधायला सुरू केले. यातून त्यांनी रणजित घाटगे व जयपॅट अकॅडमीचे धनंजय पाटील यांना बरोबर घेतले. यात रणजित घाटगे यांनी वाघजाई शाळेचे आपणच मालक असल्याचा गोंधळ घातला. पालक मेळाव्यात याच घाटगेंना शाळेतील शैक्षणिक सुविधांबाबत जाब विचारला. यात घाटगे व पालक यांच्यात मोठी बाचाबाची झाली. पालकांनी त्यांना धारेवर धरल्यानंतर त्यांनी पालकांकडूनच आपल्या जीविताला धोका असल्याचा कांगावा करीत पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. आज ते या शाळेकडे गेली पाच महिने फिरकलेले नाहीत.
याचबरोबर ज्या जयपॅट अकॅडमीला बरोबर घेतले होते. पण, या सर्व लोकांच्या वर्चस्ववादाातून या शाळेवर मालकी कोणाची हा प्रश्न उपस्थित होत असून, सध्या जॉन्सन, रणजित घाटगे हे गेली दोन महिने शाळेकडे फिरकलेलेच नाहीत. तर धनंजय पाटील यांच्याकडून ही शाळा कोल्हापूर येथील नामांकित ग्रुपला देण्याचा घाट घातला आहे.
अचानक हा निर्णय बदलून शैक्षणिक वर्षाची फी ती ही जादा दराने आकारली आहे. १५ जूनच्या पुढील चेक हातात दिले आहेत. त्यामुळे माझ्या मुलांच्या पुढील शिक्षणाची चिंता वाटत आहे.
- जयसिंग वाळवेकर, काटेभोगाव, पालक.
सध्या ही शाळा चाटे ग्रुप व संजय देसाई यांच्या पॅरामाऊंट स्कूलला परवानगी असल्याने देत आहे. अनधिकृत शाळा चालविण्यापेक्षा हा पर्याय निवडला आहे. - धनंजय पाटील, जयपॅट अकॅडमी
सध्या या शाळेत आमचे तीन विद्यार्थी आहेत. ९० हजार पॅकेज भरले आहे. धनंजय पाटील जयपॅट अकॅडमीतून दहावीपर्यंतचे शिक्षण यात देणार होते. पण, त्यांनी निर्णय बदलला असून, यातील मागील दोन वर्षांची फी वजा करून घेऊन पैसे परत करतो म्हणत आहेत, असे अनेक पालक आहेत. आता आमच्या पाल्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य काय?
- जोतिबा केरुरे, बालिंगा, पालक
आपण गेले दोन महिने दहावीच्या मुलांच्या परीक्षेच्या तयारीत होतो. आता मला शाळेत तुमचा काही संबंध नाही. तुम्ही इकडे फिरायचे नाही, अशा धमक्या येत आहेत. मात्र, आपण गेली दहा वर्षे मुलांना चांगला इंग्रजीचा शैक्षणिक पाया घातला असून, पालकांचा माझ्यावर विश्वास आहे.
- ख्रिस्तोफर जॉन्सन,
संस्थापक वाघजाई.