अतिवृष्टीचा परिणाम; शिवाजी विद्यापीठाच्या आज, उद्याच्या परीक्षा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:40 PM2023-07-26T15:40:11+5:302023-07-26T15:40:35+5:30
स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाईल
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा व या तिन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शिवाजी विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल-२०२३ उन्हाळी सत्रातील बुधवार व गुरुवारी होणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सध्या सुरू आहेत. मात्र, सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रमुख गावे, शहराशी जोडणारे मार्ग बंद झाले आहेत. त्यातच हवामान विभागाने कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर या दोन दिवशी होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित केल्या.
स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाईल. २८ जुलैपासून परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे असे डॉ. जाधव यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी एमबीए, बीफार्मसी यासह तीन अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने विविध महाविद्यालयांमध्ये सुरळीतपणे पार पडल्या.