शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:23+5:302021-09-02T04:50:23+5:30
शिरोळ : राज्य शासनाने तुकडेबंदी लागू केल्यामुळे शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीमध्ये घट झाली आहे. परिणामी शासनाच्या महसूल उत्पन्नावर ...
शिरोळ : राज्य शासनाने तुकडेबंदी लागू केल्यामुळे शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीमध्ये घट झाली आहे. परिणामी शासनाच्या महसूल उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. तारणगहाण, हक्कसोडपत्र अशा दस्तांच्या नोंदी जास्त होत आहेत. शिवाय, या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांवरही परिणाम झाला आहे.
राज्य शासनाने जुलैपासून राज्यात तुकडेबंदी कायदा लागू केला आहे. त्यामुळे २० गुंठ्यांच्या आतील दस्तनोंदी बंद झाल्या आहेत. महसूल उत्पन्नात आघाडीवर असलेल्या शिरोळ तालुक्यातील दस्तनोंदणीवर त्याचा परिणाम झाला आहे. शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी अत्यंत मंदावली आहे. तुकडेबंदी कायदा लागू होण्यापूर्वी या कार्यालयात ८०० हून अधिक दस्तांची नोंदणी करण्यात येत होती. त्यामुळे राज्य शासनाकडे मोठ्या प्रमाणात महसुली उत्पन्न जमा होत होते. मात्र, ही मोजणी आता निम्म्यावर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने तारणगहाण, हक्कसोडपत्र, घर मिळकती व अपार्टमेंट यांची दस्तनोंदणी होत आहे. शिवाय पीककर्जाबरोबर इतर कर्जासाठी गहाणखताच्या नोंदी होत असल्या तरी इतर दस्तनोंदणी मंदावली आहे. या घटकावर अवलंबून असणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांसह अन्य घटकांवर त्याचा परिणाम झाला आहे.