मैत्रीपूर्ण निवडणुकीचा प्रभावी ‘आणूर पॅटर्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:07+5:302020-12-28T04:13:07+5:30
म्हाकवे : कागल तालुक्यात सध्या ५३ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावात टोकाची ईर्षा, हाडवैर पाहायला मिळत आहे. ...
म्हाकवे :
कागल तालुक्यात सध्या ५३ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावात टोकाची ईर्षा, हाडवैर पाहायला मिळत आहे. मात्र, इतर गावांप्रमाणेच ईर्षेने आणि अटीतटीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या आणूर (ता. कागल) येथील समजूतदारपणाही वाखणण्यायोग्य आहे.येथील मतदान संपले की, उमेदवारांसह नेतेमंडळी हातात हात घालून मतदान केंद्रावरून घरी परतात. या गावाचा मैत्रीपूर्ण निवडणूक पॅटर्न अनेक वर्षांपासून परिसरात चर्चेचा विषय असला तरी, अनुकरण मात्र होताना दिसत नाही.
वेदगंगा नदीच्या उत्तर तिरावर वसलेले हे गाव शाश्वत पाण्यामुळे शेतीच्या आणि दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून सुजलाम् सुफलाम् बनले आहे. येथे मंडलिक, मुश्रिफ, संजय घाटगे, राजे यांसह संभाजी ब्रिगेड, लाल बावटा पक्षांचे अस्तित्व आहे. सर्वच निवडणुकांसह येथील ग्रामपंचायत, सेवा संस्था, दूध संस्थेच्या निवडणुकाही अटीतटीने होतात. मात्र,निवडणुकीचा फाॅर्म भरल्यापासून मतदान होईपर्यंतच ईर्षा असते. मतदान संपताच सायंकाळी ५.३० वाजता मतदान केंद्रावरून बाहेर पडताना मैत्रीपूर्ण चर्चा करत सर्वजण बाहेर पडत असतात.
विशेष म्हणजे आजतागायत कोणताही राजकीय वाद-विवाद झालेला नाही.तसेच येथेही भावकीतच परस्परविरोधी उमेदवारी दिली जाते. परंतु, हा वाद उंबऱ्याच्या बाहेर ठेवून घरगुती कार्यक्रमाला पुन्हा एकसंध होतात. त्यामुळे येथील मैत्रीपूर्ण राजकीय निवडणुकीचा पॅटर्न इतर गावांनीही अवलंबल्यास प्रशासनावरील ताण कमी होईल.
दूरदृष्टी असणारे नेतृत्व...
मारुतीराव सावडकर यांनी १९८० मध्ये नदीत उभारलेले जॅकवेल आजही सुस्थितीत आहे. त्यामुळे गावाला कायमस्वरूपी स्वच्छ पाणी मिळते. तसेच गावाच्या उत्तरेला स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही रस्त्याची (बायपास) गरज लक्षात घेऊन तो केला. त्यामुळे त्यांना एकदा सत्ता गमवावी लागली. मात्र, सर्वांची सोय झाली. तसेच शिवाजीराव चौगुले यांनी केलेल्या पाणी योजनेमुळे शेतीचे नंदनवन झाले आहे.