नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय डाक सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे : विनोदकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:24 AM2018-10-26T11:24:16+5:302018-10-26T11:24:58+5:30
डाक विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला असून, पार्सल सर्व्हिस, बँकिंग, एटीएम, पासपोर्ट, आधार अशा नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय डाक सेवेचे गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी केले.
कोल्हापूर : डाक विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला असून, पार्सल सर्व्हिस, बँकिंग, एटीएम, पासपोर्ट, आधार अशा नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय डाक सेवेचे गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी केले.
कोल्हापूर रेल्वेस्टेशन पोस्ट आॅफिसच्या नवीन वास्तूचे उद्घाटन पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील, अधीक्षक अशोक खोराटे, रेल्वे स्टेशन पोस्ट आॅफिसच्या अधीक्षिका अंजनादेवी कोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार म्हणाले, पोस्ट विभागाचा चेहरा-मोहरा बदलला असून, नवीन चेहरा आणि वेगळे वातावरण पोस्ट आॅफिस निर्माण झाले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून बँकिंग सेवेसह अन्य सेवा अधिक गतिमान केल्या असून, या सुविधांद्वारे सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत. बहुतांशी सर्व पोस्ट कार्यालये अधिक सुसज्ज आणि सुविधायुक्त झाली आहेत; त्यामुळे शासकीय सेवाही गतिमानतेने होत आहेत. संपूर्ण संगणकीकरणाद्वारे आॅनलाईन बँकिंगवर पोस्टाने अधिक भर दिला आहे.
डाकघर विभागाच्या महसूल उत्पन्नामध्ये कोल्हापूर डाकघर विभागाची आघाडी असून यापुढेही कोल्हापूर डाकघर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यक्षमपणे काम करून महसूल उत्पन्नवाढीची ही आघाडी कायम ठेवावी, असे आवाहनही पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी केले.
यावेळी पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी अधिकारी-कर्मचाºयांशी संवाद साधून भविष्यात डाक विभागाची कामगिरी अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचे आवाहन केले. प्रारंभी कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी स्वागत करून नवीन इमारतीची तसेच कोल्हापूर डाकघर विभागाच्या कामाची माहिती दिली. यावेळी कोल्हापूर डाकघर विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.