‘बेटी बचाओ’ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा
By Admin | Published: January 8, 2015 12:44 AM2015-01-08T00:44:23+5:302015-01-08T00:46:23+5:30
राजाराम माने : राष्ट्रीय बालक लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असणाऱ्यांत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश
कोल्हापूर : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करून सकारात्मक परिणामांसाठी प्रयत्न करावेत व राष्ट्रीय बालक लिंग गुणोत्तराचे प्रमाण गाठावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आज, बुधवारी येथे संबंधितांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आडसूळकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, सरकारी वकील अॅड. दिलीप मंगसुळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय बालक लिंग गुणोत्तराचे प्रमाण ९१८ पेक्षा कमी असणारे देशात १०० जिल्हे असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील १० जिल्ह्णांचा समावेश आहे. त्यांतील एक कोल्हापूर जिल्हा आहे. २०१४-१५ ते २०१६-१७ या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य विभागांमार्फत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचे संनियंत्रण पंतप्रधान कार्यालयाकडून होणार आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, मुलगाच व्हावा, या हट्टापायी औषधे घेतल्याने त्याचे विपरीत परिणाम होतात. मुलगा वा मुलगी हा विचार न करता पालकांनी सुदृृढ बालकाचा विचार करावा. बहुतांश माता मुलींना भेदभावाची वागणूक देतात. ती थांबविणे गरजेचे आहे. मुली सबला व्हायला हव्यात. यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर कृती आराखडा तयार करावा.
देश विकासाची वाटचाल करीत असताना मानवाला मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत असल्याबाबतची खंत अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, हजारो वर्षांची पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याची गरज आहे. पुरुषी अहंकार, स्त्रियांना दुय्यम स्थान, स्त्रीभ्रूणहत्या यांना स्त्रियांनी विरोधच केला पाहिजे.
किरण कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी (आरोग्य) विष्णुपंत भोसले यांनी सूत्रसंचालन केले. विलास देशमुख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तक्रारीसाठी टोल क्रमांक कार्यान्वित
डॉ. बी. डी. आडसूळकर यांनी, प्रत्येक तालुक्यासाठी वैद्यकीय अधीक्षक यांची समुचित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले. दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी सेंटर तपासणी, ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यांतर्गत दाखल झालेले गुन्हे व त्यांवरील कार्यवाही, तक्रारीसाठी ‘१८००२३३४४७५’ हा टोल क्रमांक कार्यान्वित केल्याची माहितीही सादरीकरणाद्वारे दिली.