इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यातील मलमिश्रित पाणी थेट पंचगंगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:48+5:302021-04-17T04:23:48+5:30

* नगरपालिकेने बांध दुरुस्त करावा कुरुंदवाड : इचलकरंजीतील काळ्या ओढ्यावरील बांध गेल्या काही दिवसांपासून फुटला आहे. त्यामुळे मलमिश्रित सांडपाणी ...

The effluent from the black stream of Ichalkaranji flows directly into the Panchganga | इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यातील मलमिश्रित पाणी थेट पंचगंगेत

इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यातील मलमिश्रित पाणी थेट पंचगंगेत

Next

* नगरपालिकेने बांध दुरुस्त करावा

कुरुंदवाड : इचलकरंजीतील काळ्या ओढ्यावरील बांध गेल्या काही दिवसांपासून फुटला आहे. त्यामुळे मलमिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीला मिसळत असल्याने पंचगंगा नदी दूषित बनले आहे. हा बांध नगरपालिकेने त्वरित दुरुस्त करून थेट जाणारे पाणी अडविणे गरजेचे आहे.

इचलकरंजी शहरातील सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जात असल्याने पंचगंगा नदी वारंवार दूषित होत आहे. याचा फटका शिरोळ तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. डिसेंबर महिन्यात दूषित पाणी आल्याने संतप्त स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांच्यासह स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी दूषित पाण्याचा पंचनामा करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्यावरच दोरखंडाने बांधून घातले होते. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न विधानसभेत गाजला होता. अधिकाऱ्यांना बांधून घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य सचिवांनी नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देत काळ्या ओढ्यावर ठिकठिकाणी तीन बांध घालून थेट जाणारे पाणी अडविण्याचे आदेश दिले होते.

त्यावेळी नगरपालिकेने काळ्या ओढ्यात वाळूची पोती टाकून दोन बांध घातले होते. गेल्या काही दिवसांपासून ओढ्यावरील एक बांध फुटला आहे. शिवाय ओढ्यावरील मलशुद्धीकरण केंद्र (सी ई टी पी प्रकल्प) बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याने शहरातील मलयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सीईटीपी प्रकल्प त्वरित सुरू करण्याबरोबरच ओढ्यातील फुटलेला बांध दुरुस्त केल्यास नदी प्रदूषण काहीअंशी कमी होऊ शकते. त्यासाठी नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष घालण्याची गरज आहे.

कोट - प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान सचिव यांनी इचलकरंजी नगरपालिकेला काळ्या ओढ्यावर ठिकठिकाणी तीन बांध घालण्याचे आदेश दिले होते. नगरपालिकेने दोनच बांध घातले आहेत. शिवाय एक बांध गेल्या आठ दिवसांपासून फुटला आहे. तसेच सीईटीपी प्रकल्प बंद असल्याने सांडपाणी थेट नदीत मिसळून नदी दूषित होत आहे. पालिकेने फुटलेला बांध दुरुस्त करावा. तसेच मलशुद्धीकरण प्रकल्प सुरू होईपर्यंत सांडपाणी टँकरने उचलून त्याची इतरत्र विल्हेवाट लावावी.

- बंडू पाटील, स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष

फोटो - १६०४२०२१-जेएवाय-०५

फोटो - इचलकरंजीतील काळ्या ओढ्यावरील बांध फुटल्याने मलयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे.

Web Title: The effluent from the black stream of Ichalkaranji flows directly into the Panchganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.