Kolhapur: इचलकरंजीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न - मंत्री हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:27 IST2025-02-11T13:27:07+5:302025-02-11T13:27:28+5:30
सीपीआरमधील सेवांचे लोकार्पण

Kolhapur: इचलकरंजीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न - मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : शाहू महाराजांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी दिग्विजय खानविलकर यांनी खूप परिश्रम घेतले. आता इचलकरंजीतही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले.
सीपीआरमधील नूतनीकरण वार्ड, आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्सच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मुश्रीफ म्हणाले, मी या खात्याचा कार्यभार घेण्याआधी सीपीआरला यायचो. तेव्हा रस्त्यावरून घाण पाणी व्हायचे. खोल्यांमध्ये अंधार होता. रुग्णांचे नातेवाईक कुठेही झोपायचे. सीपीआर हे अनेक समस्यांनी ग्रासले होते. म्हणूनच खात्याचा मंत्री झाल्यानंतर चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. एस. एस. माेरे यांनी स्वागत केले. तर कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शिशिर मिरगुंडे यांनी आभार मानले.
या गोष्टी झाल्या पूर्ण..
- दूधगंगा इमारतीत १५ बेड्सचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, ३० बेड्सचा पुरुष शस्त्रक्रिया वार्ड व ३० बेड्सचा स्त्री शस्त्रक्रिया वार्ड
- भोगावती इमारतीत स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वार्डचे नूतनीकरण. दोन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स कार्यरत
- औषधशास्त्र/ मेडिसिन विभागात ३० बेड्सचा पुरुष वार्ड आणि ३० बेड्सचा स्त्री वार्ड
- नर्सिंग मुलींचे हॉस्टेल क्षमता- १२० नूतनीकरण
- हिरण्यकेशी इमारतीमध्ये कान, नाक व घसाशास्त्र विभागाचे नूतनीकरण. यामध्ये पुरुष वॉर्ड १५ बेड्स व स्त्री वार्ड १५ बेड्स
- बाह्यरुग्ण विभाग, कान, नाक व घसाशास्त्र विभाग
- मेंदूच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक मायक्रोस्कोप उपलब्ध
- सरस्वती इमारतीमधील मनोविकृतीशास्त्र विभागाचे नूतनीकरण
- कैदी वार्ड इमारतीच्या नूतनीकरण
अडीच लाख मुलींना लसीकरण
मुश्रीफ म्हणाले, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी जिल्ह्यातील अडीच लाख मुली आणि युवतींना एचपीव्ही ही कॅन्सरप्रतिबंधक मोफत लस देणार आहे. कोल्हापूरमध्ये डॉ. राधिका जोशी या स्वयंसेवी संस्थेमार्फत हे काम करत आहेत. हेच लसीकरण आता दानशूरांच्या सहभागातून संपूर्ण जिल्ह्यातील मुलींसाठी करण्यात येईल.