ग्राम पंचायतीकडून जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:58+5:302021-06-09T04:31:58+5:30
* लोकमत इफेक्ट उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाचे अधिकारी व ...
* लोकमत इफेक्ट
उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिली. ‘लोकमत’ने ‘चिंचवाडात अपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्याचा दाखला’ या मथळ्याखाली रविवारी (दि. ६) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन चिंचवाड ग्राम पंचायतीने जोरदार हालचाली करीत प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
चिंचवाड येथे तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या फंडातून जलशुद्धीदीकरण प्रकल्प मंजूर झाला होता. त्याचे काम हायटेक स्विटवॉटर टेक्नॉलॉजी, सुरत यांना देण्यात आले होते. मात्र, ग्राम पंचायतीकडून प्रकल्प सुरू नसताना देखील सुरू असल्याचा दाखला ऑक्टोबर २०२० मध्ये दिला होता. त्याबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत यांत्रिकी विभागाचे सुरेश आइंगडे व दिगंबर मालुसरे यांनी या प्रकल्पाला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व आप्पासोा कदम यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने प्रकल्प सुरू करण्याच्या मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. परंतु मंगळवारी पुन्हा या प्रकल्पाची पाहणी करण्यात येणार असल्याचे ग्राम पंचायतीकडून सांगण्यात आले.
चौकट -
ग्रामस्थांना २ रुपयांत पाणी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून, दोन रुपयांत वीस लिटर पाणी मिळणार आहे. तसेच त्यासाठी एटीएम कार्डाची सोय करण्यात आली आहे. ज्यांना कार्ड हवे असेल त्यांनी ग्राम पंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच ज्योती काटकर यांनी केले.