मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होऊ नये यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:10 PM2020-07-02T17:10:14+5:302020-07-02T17:16:54+5:30
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईतील सर्वच मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याच धर्तीवर राज्यभरही मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापनेबाबत स्वत:हूनच निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत, असे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी येथे सांगितले.
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईतील सर्वच मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याच धर्तीवर राज्यभरही मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापनेबाबत स्वत:हूनच निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत, असे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी येथे सांगितले.
मुंबईच्या लालबागच्या राजाने मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने बोलताना राज्यमंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व गणेश मंडळांशी संवाद साधला.
सर्वच मंडळांनी कोरोनाची दाहकता लक्षात घेऊन उत्सव साजरा करणार नाही असे सांगितले आहे. राज्य सरकार जो निर्णय घेईल, त्याला पाठिंबाही दर्शवला आहे. आता त्याच धर्तीवर राज्यभरातील इतर शहरे व ग्रामीण भागांतील गणेश मंडळाना आवाहन केले आहे. मुंबईच्या निर्णयाचे अनुकरण करावे अशा सूचना देण्याबरोबरच तसे आदेशही येत्या काही दिवसांत काढले जाणार आहेत.
कोरोना व लॉकडाऊनमुळे राज्यातील आर्थिक घडी विस्कटली आहे. झालेली तूट भरून काढण्यासाठी, नव्या उपाययोजना सुचविण्यासाठी वित्त विभागाने अभ्यास समिती नियुक्त केली आहे. त्यांच्या सूचनांनुसार अर्थचक्र रुळांवर आणण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहेत, असे राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.
पडळकर यांचा विषय संपला
आमदार गोपीचंद पडळकर यांचा विषय शरद पवार यांनीच संपवला आहे. आता त्यांना महत्त्व देऊ नये. पडळकर यांच्या ऑडिओ, व्हिडीओ क्लिप्स तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.
उस्मानाबाद प्रकरणी कारवाई होणार
उस्मानाबाद येथील पोलीस ठाण्यात निवृत्तीबद्दल पोलिसांनी मिरवणूक काढून सहकाऱ्याला निरोप दिला. सर्व नियम पोलिसांनीच पायदळी तुडवल्याच्या या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, असे राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.
शेतकरी गटाच्या मालकीचे कोल्ड स्टोअरेज स्थापणार
बेदाणा, गुळासारख्या शेतमालाच्या साठवणुकीसाठी सध्या खासगी कोल्ड स्टोअरेजचा आधार घ्यावा लागत आहे; पण येथून पुढे शेतकरी गटाच्या मालकीची कोल्ड स्टोअरेज स्थापन करण्यासाठी बाजार समित्यांना जागांचे सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राज्यमंत्री देसाई यांनी सांंगितले.
पैसे घेऊन पास देणाऱ्यांवर कारवाई
एक हजार रुपये घेऊन ई-पास दिला जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यमंत्री देसाई यांनी मुंबईतील रॅकेट पूर्णपणे मोडून काढले आहे, त्याच धर्तीवर कोल्हापुरातही असेच घडत असल्यास कडक कारवाई करा असे बजावले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एकावर निलंबनाची कारवाई केली आहे. कुणालाही पाठीशी घालणार नाही असे स्पष्ट केले.