कृष्णा योजनेच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न, राजू शेट्टींसोबत ताराराणी आघाडीची बैठक : खासदार निधीतून कूपनलिकां
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:02 PM2018-02-19T23:02:30+5:302018-02-19T23:06:33+5:30
इचलकरंजी : वारणा नळ योजनेला होणारा विरोध पाहता कृष्णा नळ योजनेची दुरुस्ती आणि पंपाची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. म्हणून शासनाच्या साहाय्याने कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलण्याचा त्वरित प्रयत्न
इचलकरंजी : वारणा नळ योजनेला होणारा विरोध पाहता कृष्णा नळ योजनेची दुरुस्ती आणि पंपाची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. म्हणून शासनाच्या साहाय्याने कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलण्याचा त्वरित प्रयत्न करण्याचा निर्णय खासदार राजू शेट्टी व ताराराणी विकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरात विविध ठिकाणी ८७ कूपनलिका खोदण्यात येतील, अशीही माहिती खासदार शेट्टी यांनी यावेळी दिली.
दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा नदीतून इचलकरंजीस पाणी आणणारी नळ योजना गेल्या वर्षापासून प्रलंबित आहे. सुमारे ८२ कोटी रुपयांच्या योजनेपैकी वारणा नदीकाठावर जॅकवेल, पॉवर हाऊस, पंप हाऊस, आदींच्या उभारणीची निविदा आर. ए. घुले या मक्तेदारांना देण्यात आली असून, निविदेची मुदतही जानेवारी महिन्यात संपली आहे. वारणा नदीतून पाण्याचा उपसा करण्यासाठी नदीकाठावरील गावांचा होणारा तीव्र विरोध त्याला कारणीभूत असून, आता ही नळ योजना अनिश्चितेच्या फेºयात अडकली आहे.
अशा पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी व ताराराणी विकास आघाडीमध्ये जलतरण तलावावरील कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीसाठी ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, संजय तेलनाडे, राजवर्धन नाईक, इकबाल कलावंत, भाऊसाहेब आवळे, महादेव गौड, विजय भोसले, आदी उपस्थित होते.
वारणा नळ योजनेला होणारा विलंब पाहता सध्या कार्यान्वित असलेल्या कृष्णा नळ योजनेची सडलेली ८ किलोमीटरची दाबनलिका बदलून घेणे. तसेच ‘पंचगंगा व कृष्णे’तून पाणी उपसा करणारे पंप बदलणे. जेणेकरून प्रत्येक उन्हाळ्यात भासणारी पाणीटंचाई भासणार नाही, असा निर्णय या बैठकीत झाला.
तसेच नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी असलेली दुकान गाळ्यांची लिलाव प्रक्रिया चालू ठेवावी, ज्यामुळे पालिकेला ७२३ गाळ्यांपासून वार्षिक सुमारे ४.५ कोटी रुपये भाडे मिळाले. नजीकच्या दोन महिन्यांत खासदार निधीतून शहरात विविध ठिकाणी ८७ कूपनलिका खोदल्या जातील, असेही ठरले. याशिवाय खासदार शेट्टी यांनी शहराचा संपर्क वाढवावा, असेही त्यांना सूचित केले.
यंत्रमागासाठी सवलत
इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे एक शिष्टमंडळ खासदार शेट्टी यांना याचवेळी भेटले. असोसिएशनचे संचालक चंद्रकांत पाटील, नारायण दुरूगडे, आदींनी यंत्रमाग क्षेत्राविषयी निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा त्यांच्यासमोर घेतला.तसेच यंत्रमागासाठी वीज दरामध्ये प्रतियुनिट एक रुपयाची सवलत आणि यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी पाच टक्के अनुदान सरकारने ताबडतोब देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.यंत्रमागधारकांच्या या मागण्यांसंदर्भात वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली.