यड्रावचा एअर सेपरेशन प्लांट सुरू करण्यासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:48+5:302021-04-30T04:28:48+5:30
यड्राव : येथील महालक्ष्मी गॅस प्रकल्पाचा बंद असलेला एअर सेपरेशन प्रकल्प सुरू झाल्यास आणखी सहा टन ऑक्सिजन गॅस उपलब्ध ...
यड्राव : येथील महालक्ष्मी गॅस प्रकल्पाचा बंद असलेला एअर सेपरेशन प्रकल्प सुरू झाल्यास आणखी सहा टन ऑक्सिजन गॅस उपलब्ध होऊ शकतो. परंतु बंद असलेला प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतात, ते पाहून प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रत्यक्ष महालक्ष्मी गॅस प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्प बंदची कारणे, त्यासाठी अर्थपुरवठा, विद्युत पुरवठा याबाबत माहिती घेतली व प्रकल्प सुरू होण्याच्या दृष्टीने होस्पेट येथील कंपनीचे जनरल मॅनेजर रविराज यांच्याशी संपर्क साधून सूचना दिल्या व त्याबाबत तंत्रज्ञांशी चर्चा करून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक ती माहिती व अंदाजित खर्चाची माहिती काढण्यास सांगितले आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार उल्हास पाटील, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे, मंडल अधिकारी दिलीप गायकवाड, तलाठी नितीन कांबळे, सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर, प्रकल्पाचे व्यवस्थापक अमर तासगावे, सचिन राऊत, सूरज कोरे, विष्णू तासगावे, राजू उदगावे उपस्थित होते.
कोट - सध्या एअर सेपरेशन प्लांट अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सर्वत्र सुरू आहेत. परंतु हा प्रकल्प वीस वर्षांपूर्वीचा असून, तो २०१८ मध्ये बंद पडला आहे. त्यातील मशीनरीचे खराब झालेले पार्ट कुठे व कसे उपलब्ध होतील, हे सांगता येत नाही. उपलब्ध होणाऱ्या साहित्यावरच प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.
- अमर तासगावे, व्यवस्थापक, महालक्ष्मी गॅस
फोटो - २९०४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळी - यड्राव (ता. शिरोळ) येथील महालक्ष्मी गॅस प्रकल्पाला भेट देऊन बंद असलेल्या एअर सेपरेशन प्रकल्पाची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली. यावेळी खासदार धैर्यशील माने, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे, अमर तासगावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .