कोल्हापूरचा दसरा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न, यंदा प्रथमच जिल्हा प्रशासनाचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 12:07 PM2022-10-03T12:07:29+5:302022-10-03T12:08:08+5:30

दरवर्षीच्या राजेशाही दसरा महोत्सवामध्ये बदल न करता त्यात लोकसहभाग वाढविण्याचा शासन प्रयत्न करेल.

Efforts to bring Dussehra festival of Kolhapur to international level | कोल्हापूरचा दसरा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न, यंदा प्रथमच जिल्हा प्रशासनाचा सहभाग

संग्रहित फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : यावर्षी भव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातून राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या सामाजिक समतेच्या संदेशाचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा श्री शाहू महाराज छत्रपती यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

शाही दसरा महोत्सवाच्या आयोजनाबाबत न्यू पॅलेस येथे रविवारी झालेल्या बैठकीस माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, दसरा महोत्सव समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

प्रशासनाच्या सहयोगाने यावर्षी होणाऱ्या शाही दसरा महोत्सवात विविध घटकांतील नागरिक सहभागी होतील यासाठी नियोजन करावे आणि या महोत्सवाला शाहूकालीन महोत्सवाचे स्वरूप प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री शाहू महाराज छत्रपती यांनी केले, तर या महोत्सवात शाहूकालीन विविध मर्दानी खेळ, कलांचे सादरीकरण व्हावे, अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. कोल्हापूरचा दसरा महोत्सव भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याबाबत मालोजीराजे छत्रपती यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

दीपक केसरकर म्हणाले, घोडे, उंट, मर्दानी खेळ, पोवाडा, कुस्ती प्रात्यक्षिके, पारंपरिक वेशभूषा अशा शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात कोल्हापूरचा दसरा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरवर्षीच्या राजेशाही दसरा महोत्सवामध्ये बदल न करता त्यात लोकसहभाग वाढविण्याचा शासन प्रयत्न करेल. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दसरा महोत्सवाच्या तयारीची माहिती दिली.

या महोत्सवात महिला बचत गटांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले. या महोत्सवासाठी नागरिकांचा प्रतिसाद पाहता, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

Web Title: Efforts to bring Dussehra festival of Kolhapur to international level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.