कोल्हापूर: इचलकरंजीत आवाडे-हाळवणकर एकत्र आल्यास भाजपला संधी; कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाला वेळ लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 04:50 PM2022-09-24T16:50:47+5:302022-09-24T16:56:16+5:30

महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आवाडे-हाळवणकर एकत्र आले तरी विधानसभा निवडणुकीत दोघांपैकी कोण उमेदवार असणार? तसेच जो उमेदवार ठरेल, त्याचा दुसऱ्याने प्रचार करावा लागेल. हे रूचणार का, असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

Efforts to bring MLA Prakash Awade and former BJP MLA Suresh Halvankar together | कोल्हापूर: इचलकरंजीत आवाडे-हाळवणकर एकत्र आल्यास भाजपला संधी; कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाला वेळ लागणार

कोल्हापूर: इचलकरंजीत आवाडे-हाळवणकर एकत्र आल्यास भाजपला संधी; कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाला वेळ लागणार

Next

अतुल आंबी

इचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे व भाजपाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना एकत्र आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट संकेत दिले जात आहेत. हे दोघे एकत्र आल्यास आगामी इचलकरंजी महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपचा जोर वाढणार आहे. याचे विरोधकांसमोर तगडे आव्हान असणार आहे. परंतु दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होण्यास थोडा वेळ लागणार आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्पष्ट संकेत मिळाल्याने आवाडे-हाळवणकर एकत्र येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही गटात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. एकमेकांविरोधात राजकीय, सामाजिक, न्यायालयीन कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप झाल्याने दोन्ही गटात एकमेकांबद्दल कटूता आहे. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार आवाडे यांनी अपक्ष निवडून येऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांत भाजपचा जप सुरू केला. स्थानिक पातळीवर त्यांनी हाळवणकरांशी जुळवून घेत त्यांच्यावरील टीका बंद करून कौतुक सुरू केले. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचे संकेत आवाडे यांनी जाहीरपणे दिले.

दोन्ही गट एकत्र येऊन सर्व जागा ताकदीने लढवू शकतात. दोघांची ताकद एकत्र आल्यास महापालिकेत सत्ता मिळू शकते. त्यामुळे पक्षीय पातळीवरूनही त्यानुसार हालचाली सुरू आहेत. याचे संकेत देत मंत्री पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्वांना आदेश मानावा लागेल. जे पक्षाचा आदेश डावलतील, ते बाजूला फेकले जातील, असे स्पष्टपणाने सांगितले. याबाबत हाळवणकर गटाचे कार्यकर्ते म्हणतात, हाळवणकर यांच्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई पक्षाने करावी. त्यानंतर आपली मते लादावीत.

हाळवणकरांना पक्षाने उचित पद देऊन सन्मान केल्यास कार्यकर्त्यांनाही बळ मिळेल; अन्यथा हाळवणकरांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांवरही अन्याय होत राहील. प्रत्येक कार्यक्रमात दुय्यम स्थान मिळेल, अशा भावना व्यक्त केल्या. तर आवाडे गटाचे कार्यकर्ते म्हणतात, अण्णा म्हणतील ती दिशा मानणारे कार्यकर्ते प्रभावीपणे कार्यरत राहतील. ज्यांना भाजपचे कमळ रूचणार नाही, ते वेट अ‍ॅण्ड वॉच करतील. परंतु आवाडेंना सोडून अन्यत्र जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करतात.

संभ्रमावस्थेमुळे अस्वस्थतता

दोघे एकत्र येणार किंवा नाही. त्यानंतरच नगरसेवकपदासाठीच्या जागांची निश्चितता होणार आहे. या निर्णयात संभ्रमावस्था असल्याने इच्छुकांच्यात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. त्यातच निवडणुका पुढे गेल्याने भागातील नियोजन, वातावरणनिर्मिती, भेटी-गाठी सध्या थंडावल्या आहेत. राजकीय चित्र स्पष्ट झाल्यानंतरच कार्यकर्ते अ‍ॅक्टीव्ह मोडवर येणार आहेत. तोपर्यंत दोन्ही गटातील कार्यकर्ते वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिकेत स्तब्ध आहेत.

कट्टर विरोधक थांबून राहणार

केवळ आवाडे यांना विरोध म्हणून भाजपमध्ये आलेले तसेच भाजपा व हाळवणकर यांना विरोध म्हणून आवाडेंसोबत असलेले दोन्ही गटाचे कट्टर समर्थक आवाडे-हाळवणकर एकत्र आले तरी ते आपल्या भूमिकेसोबत ठाम राहत शांत बसण्याची भूमिका घेणार. परंतु तुलनेने अशा कट्टर कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने दोन्ही नेते अथवा पक्ष त्याचा कितपत विचार करणार, हे काळ ठरवेल.

विधानसभा निवडणुकीचे काय?

महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आवाडे-हाळवणकर एकत्र आले तरी विधानसभा निवडणुकीत दोघांपैकी कोण उमेदवार असणार? तसेच जो उमेदवार ठरेल, त्याचा दुसऱ्याने प्रचार करावा लागेल. हे रूचणार का, असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीवेळी घडणाऱ्या राजकीय घडामोडीनंतरच विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल अथवा भाजपने हाळवणकरांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्रिपद दिल्यास आपोआपच त्यांचा विधानसभा निवडणुकीवरील दावा संपेल.

Web Title: Efforts to bring MLA Prakash Awade and former BJP MLA Suresh Halvankar together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.