वांगी १२०, टोमॅटो १००, भेंडी ८०, बटाटा ५० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 09:15 PM2020-07-19T21:15:29+5:302020-07-19T21:40:14+5:30

लॉकडाऊन सोमवारपासून कडक होणार असल्याने लोकांची सलग दुसऱ्या दिवशी रविवारी भाजीपाला, धान्य खरेदीसाठी मंडईमध्ये गर्दी उसळली. आवक तेवढीच व प्रत्येकाने जास्त भाजीपाला खरेदी केल्याने त्याचे दरही गगनाला भिडले. वांगी व श्रावण घेवडा १२० रुपये, टोमॅटो १००, भेंडी ८० रुपये तर बटाटा ५० रुपये किलोने विक्री झाली. लोकांनीही कोणतेही कुरकुर न करता मिळेल ती भाजी खरेदी केली. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनापासून संरक्षण या गोष्टी गर्दीत वाहून गेल्या.

Eggplant 120, tomato 100, okra 80, potato 50 rupees per kg | वांगी १२०, टोमॅटो १००, भेंडी ८०, बटाटा ५० रुपये किलो

कोल्हापुरात सोमवारपासून लॉकडाऊन कडक होणार असल्याने रविवारी धान्य व भाजीपाला खरेदीसाठी मंडईमध्ये गर्दी उसळली. सकाळी अकराच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती भागातील कपिलतीर्थ मंडई अशी फुलून गेली होती (छाया : युवराज कवाळे)

Next
ठळक मुद्देवांगी १२०, टोमॅटो १००, भेंडी ८०, बटाटा ५० रुपये किलोलॉकडाऊन होणार असल्याने भाजीपाला कडाडला : दुपारीच झाली सगळी विक्री

कोल्हापूर : लॉकडाऊन सोमवारपासून कडक होणार असल्याने लोकांची सलग दुसऱ्या दिवशी रविवारी भाजीपाला, धान्य खरेदीसाठी मंडईमध्ये गर्दी उसळली. आवक तेवढीच व प्रत्येकाने जास्त भाजीपाला खरेदी केल्याने त्याचे दरही गगनाला भिडले. वांगी व श्रावण घेवडा १२० रुपये, टोमॅटो १००, भेंडी ८० रुपये तर बटाटा ५० रुपये किलोने विक्री झाली. लोकांनीही कोणतेही कुरकुर न करता मिळेल ती भाजी खरेदी केली. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनापासून संरक्षण या गोष्टी गर्दीत वाहून गेल्या.

प्रत्येक रविवारी आठवड्याची भाजी खरेदी करणारा मोठा वर्ग आहे. रविवारी सकाळी लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, ऋणमुक्तेश्वर परिसर, शिंगोशी मार्केट, पाडळकर मार्केट येथे लोक भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या संख्येने जातात. लॉकडाऊन एक आठवड्याचाच आहे परंतु केवळ भीतीपोटी लोक खरेदीसाठी जास्त संख्येने बाहेर पडले. शनिवारी बहुतांशी लोकांनी कडधान्ये व इतर आवश्यक धान्याची खरेदी केली व रविवारी भाजीपाला खरेदी केला.

सकाळी कपिलतीर्थ मंडईत तर उभा राहायला जागा नाही असे चित्र दिसत होते. शिल्लक राहिली तर त्या भाजीपाल्याचे उद्या काय करायचे म्हणून व्यापाऱ्यांनी नेहमी लागते तेवढीच भाजी खरेदी केली होती. आणि लोकांनी मात्र नेहमी लागते त्याहून जास्त भाजी खरेदी केली. त्यामुळेच दर गगनाला भिडले. टोमॅटो यंदा वर्षभर फारसा कधी २५ रुपये किलोच्या पुढे गेला नव्हता. लालभडक टोमॅटो अनेक दिवस १० रुपये किलोनेच मिळत होते.

या रविवारी मात्र त्यांने शंभरी ओलांडली. तेवढे पैसे देऊनही बाजारात टोमॅटो मिळत नव्हता. श्रावण घेवड्याची आवक कमी होती त्यामुळे तो घेण्यासाठी तर लोकांच्या उड्या पडल्या. इतर भाजीपाल्याचीही स्थिती अशीच होती. मेथीची पेंडी ३० रुपयांवर गेली होती. हिरव्या मिरच्याही ८० रुपयांनी किलो अशा होत्या. ढबू मिरचीचा दरही १२० रुपयांवर गेला होता. पावसाळा सुरु झाल्यापासून दहा रुपयांना दहा लिंबू मिळत होते परंतू त्याचाही दर दहा रुपयांना ५ असा झाला होता.

एका कुटुंबासाठी आठवड्याचा भाजीपाला व अन्नधान्य, फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला हजार रुपये पुरले नाहीत. मागणी जास्त असल्याने चार पैसे कमी करतोस असेही कुणी विचारत नव्हते. उलट व्यापारी जो दर सांगेल त्या दरांने लोकांनी भाजीपाला खरेदी केली. दुपारनंतर बहुतांशी व्यापाऱ्यांकडील माल संपला होता.

उपवासाच्या वस्तूंना मागणी

श्रावणही  सोमवारपासूनच सुरु होत आहे. त्यामुळे उपवासाला लागणारी वरी तांदूळ, शाबू ,राजिगरा लाडू, शाबूच्या पापड्या असल्या पदार्थांचीही लोकांनी खरेदी केली.

लॉकडाऊनच्या काळात घरी बसून खायला काहीतरी हवे म्हणून लोकांनी चिरमुरे, फुटाणे, खारी शेंगदाणे, लाह्या, विविध प्रकारचे पोहे खरेदीचा सपाटाच लावला. त्यामुळे अशा दुकानांसमोरही लोकांनी गर्दी केल्याचे दिसत होते.

पावसाने उसंत

शनिवारी व रविवारी दिवसभर पावसाने चांगलीच उसंत दिली. त्यामुळे लोकांना हवी तशी खरेदी करता आली. दिवसभर पाच-सहा पिशव्यांचे ओझे घेवून घरी परतणारे लोक शहरांत दिसत होते.

फळांना मागणी

श्रावणात विविध उपवास असल्याने केळी,पपई, पेरू, तोतापुरी आंबे यांचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली.

 

Web Title: Eggplant 120, tomato 100, okra 80, potato 50 rupees per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.