कृष्णा काठची वांगी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:22 AM2021-05-23T04:22:41+5:302021-05-23T04:22:41+5:30
बुबनाळ : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कृष्णा काठची प्रसिद्ध वांगी रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोना ...
बुबनाळ : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कृष्णा काठची प्रसिद्ध वांगी रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाने प्रादुर्भाव थोपवण्यासाठी निर्माण झालेल्या संचारबंदीचा वांगी उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. गौरवाड ता. शिरोळ येथील सुभाष हुलवान या शेतकऱ्याने पिकविलेल्या वांग्याला संचारबंदीने बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. परिणामी, शेतातच वांगी कुजत असल्याने वांगी रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.
गौरवाड येथील सुभाष हुलवान या शेतकऱ्याने सोसायटीतून एक लाख रुपये कर्ज घेऊन औरवाड-गौरवड रस्त्यावरील शेतीत एक एकरात वांगी पिकाचे उत्पादन घेतले होते. पीकही चांगले आले. आठ ते दहा हजार रुपयांची वांग्याची बाजारपेठेत विक्रीही केली; मात्र त्यातच लॉकडाऊन लागल्याने भाजीपाल्याचे लिलाव बंद झाले. उत्पादित मालाचा उठाव होत नसल्याने माल शिवारातच राहिला. वादळ व पावसाचाही दणका बसला. या पावसाच्या दणक्यातून वाचण्याचा प्रयत्न केला; मात्र औषधे आणि खते संचारबंदीत मिळत नसल्याने या तिहेरी संकटामुळे झाडालाच वांगी किडली आणि वांगी तोडून टाकण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहिला नसल्याचे हुलवान यांनी सांगितले.
कोट : २०१९ ला आलेला महापूर, त्यानंतरचे कोरोनाचे संकट यामुळे शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. सोसायटीतून कर्ज काढून वांग्याचे उत्पादन घेतले; मात्र कोरोना संचारबंदीमुळे बाजार समिती बंद असल्याने नुकसान झाले आहे. शासनाने मदत करावी.
-
सुभाष हुलवान, गौरवाड शेतकरी
फोटो :
ओळ - : गौरवाड येथे रस्त्यावर टाकण्यात आलेली वांगी.