आयशर टेम्पोखाली सापडून वहिफणी व्यावसायिक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 03:17 PM2021-07-06T15:17:37+5:302021-07-06T15:18:34+5:30
Accident Ichlkarnji Kolhapur : इचलकरंजी येथील डेक्कन मिल चौकात आयशर टेम्पोखाली सापडून मोपेडस्वार तरुण ठार झाला. नवनाथ राजाराम पोवार (वय ३५, रा. जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. तो वहिफणीचा व्यवसाय करीत होता. या अपघातात त्याचा मित्र गणेश रवींद्र परीट (२८, रा. कबनूर, ता.हातकणंगले) हा जखमी झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी बारा वाजता घडला.
इचलकरंजी : येथील डेक्कन मिल चौकात आयशर टेम्पोखाली सापडून मोपेडस्वार तरुण ठार झाला. नवनाथ राजाराम पोवार (वय ३५, रा. जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. तो वहिफणीचा व्यवसाय करीत होता. या अपघातात त्याचा मित्र गणेश रवींद्र परीट (२८, रा. कबनूर, ता.हातकणंगले) हा जखमी झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी बारा वाजता घडला.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नवनाथ हा मंगळवारी दुपारी नवनाथ व त्याचा मित्र गणेश हे दोघे मोपेड (एमएच ०९ ईडी ९१२७) वरून निघाले होते. त्याचवेळी पुणे येथील एका ट्रान्स्पोर्ट कंपनीचा आयशर टेम्पो (एमएच १२ एनएक्स ४१६४) डेक्कन चौकातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दिशेने येत होता.
त्यावेळी नवनाथ याच्या मोपेडच्या आडवे आलेल्या एकाला चुकविण्याच्या नादात मोपेड घसरून आयशर टेम्पोच्या चाकाखाली गेले. त्यामध्ये टेम्पोचे चाक नवनाथ याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला, तर गणेश हा जखमी झाला. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गणेशला खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जीवनमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह इंदिरा गांधी रुग्णालयात विच्छेदनासाठी नेला. पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त टेम्पो व चालक पांडुरंग भरत साठे (रा. खटाव, जि.सातारा) याला ताब्यात घेतले.
घटनास्थळी नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. नवनाथ हा इचलकरंजी भाजपा शहर उपाध्यक्ष राजाराम पोवार यांचा मुलगा आहे. नवनाथ याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे. मुख्य मार्गावर घटना घडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.