कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमांवर आठ तपासणी नाके, 'त्यांनाच' दिला जाणार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:57 PM2021-12-02T17:57:57+5:302021-12-02T19:38:39+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात कोगनोळी, आंबोली, करूळ, आंबा, राष्ट्रीय महामार्ग यांसारख्या आठ ठिकाणांहून प्रामुख्याने प्रवेश करता येतो. या सर्व ठिकाणी महसूल व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने तपासणी नाके उभे करण्यात येत आहेत.
कोल्हापूर : कोविड विषाणूच्या उत्परिवर्तीत ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या आठ रस्त्यांवर तपासणी नाके उभारणीचे काम बुधवारी युद्धपातळीवर सुरु होते. या सर्व ठिकाणी ७५ हून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहे.
चारच दिवसांपूर्वी दक्षिण अफ्रिकेतील कोविड विषाणूच्या उत्परिवर्तीत ओमायक्रॉनबाबतच्या बातम्या झळकल्यानंतर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर तातडीने कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पातळीवरही जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी तातडीने बैठका घेत कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच सर्व ठिकाणी प्रवेश असल्याचे जाहीर केले आहेत. तसेच विविध कार्यक्रम, विवाह समारंभ यावरही बंधने आणण्यात आली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात कोगनोळी, आंबोली, करूळ, आंबा, राष्ट्रीय महामार्ग यांसारख्या आठ ठिकाणांहून प्रामुख्याने प्रवेश करता येतो. या सर्व ठिकाणी महसूल व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने तपासणी नाके उभारण्याचे काम बुधवारी सुरू करण्यात आले. या प्रत्येक ठिकाणी ६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तर कोगनोळी येथे दोन सत्रामध्ये १५ पोलीस आणि दोन अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत.
या सर्व ठिकाणाहून ज्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत त्यांनाच कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. अचानक या सर्व बदललेल्या नियमांमुळे प्रवासी हैराण झाले असून, तपासणी नाक्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
अनेक ठिकाणाहून चौकशी सुरू
कोल्हापूर जिल्ह्यात दोन डोस शिवाय परवानगी नसल्याने याबाबत कर्नांटक, गोवा आणि मुंबई, पुण्याहून येणाऱ्या नागरिकांनी चौकशी सुरू केली आहे. अनेक प्रवासी नाक्यावरच चाचणी करण्याची सोय आहे का, अशीही विचारणा करत होते.
कोगनोळी टोल नाक्याजवळ अधिक ताण
मुंबई, पुण्याहून येणारी वाहने कर्नाटक आणि गोव्याकडे जात असल्याने तसेच कर्नाटकातून आणि गोव्याकडून कोल्हापूरकडे येणारी वाहने कोगनोळी टोल नाकामार्गे येत असल्याने या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.