मटका चालक विजय पाटीलसह आठजण हद्दपार
By Admin | Published: July 4, 2017 01:20 AM2017-07-04T01:20:09+5:302017-07-04T01:20:09+5:30
मटका चालक विजय पाटीलसह आठजण हद्दपार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मटका चालक विजय पाटीलसह आठजणांना पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले, तर तेरा व्यावसायिकांकडून पन्नास हजार रुपयांचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र लिहून घेत त्यांना सुधारण्याची संधी दिली. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातून मटका व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी मटका चालक विजय पाटीलसह २१ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविले होते.यास मंजुरी मिळाल्याने पोलिसांनी संबंधितांच्या घरावर हद्दपारीच्या नोटिसा लावल्या होत्या. सोमवारी या सर्वांना जिल्ह्णातून हद्दपार केले. वारंवार या सर्वांच्यावर कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक मोहिते यांनी सांगितले.
यांना दिली संधी
अवैध व्यवसायात प्रथमच सहभागी असलेल्या तेराजणांना सुधारण्याची संधी पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून पन्नास हजार रुपयांच्या हमी प्रतिज्ञापत्रावर लेखी लिहून घेतले आहे. त्यामध्ये समीर सुरेश नायर (५१, रा. न्यू शाहूपुरी), प्रकाश गणपती शिंदे (५०, मंगळवार पेठ), योगेश आनंदराव पावले (३६, रा. कळंबा रिंगरोड), अनिल आनंदा बावचकर (३५, रा. गोगवे, ता. शाहूवाडी), कपिल दीपक जगताप (३६, कोल्हापूर), सतीश जयवंत माने (३०, रा. फुलेवाडी), रणजित रामचंद्र मोहिते (४२, रा. राजोपाध्येनगर), संतोष सुरेश देवणे (२७, रा. मंगळवार पेठ), उदय राधाकृष्ण बागल (४३, फुलेवाडी), अजिंक्य बाबूराव चव्हाण (२९, संभाजीनगर), सर्वेश मनोहर यादव (२९, रा. जवाहरनगर), अर्शद इम्तियाज मोमीन (२९, बिंदू चौक परिसर), फिरोज खलील मुजावर (४९ रा. यादवनगर) यांचा समावेश आहे.