आठशे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: March 27, 2016 11:38 PM2016-03-27T23:38:17+5:302016-03-28T00:11:27+5:30
ठिबक सिंचन योजना : कागल तालुक्यातील २१५ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर
जहाँगिर शेख -कागल दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत चालला असल्याने ‘पाणी वाचवा’ ही मोहीम सर्वत्र मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. शेतीसाठीही पाणी देण्याबद्दल वेगवेगळे उपाय योजले गेले आहेत. त्यामध्ये ‘ठिबक सिंचन’ या योजनेला महत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने ५० टक्के अनुदानही सुरू केले. असे असताना सन २०१३-२०१४ या मागील वर्षात कागल तालुक्यातील २१५ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदान मंजूर होऊन देखील त्यापैकी ५४ जणांनाच हे अनुदान मिळाले आहे. १६१ शेतकरी गेली तीन वर्षे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास ८०० शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते.
२०१३-२०१४चे हे अनुदान आलेले नसताना २०१४-२०१५ आणि चालू वर्ष २०१५-२०१६ साठी मात्र नव्याने मंजुरी मिळत शेतकऱ्यांना हे अनुदान आले आहे. मग २०१३-२०१४ चे अनुदान न देण्यामागे नेमके कारण काय? असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांमधून उमटत आहे. २०१३ मध्ये ठिबक सिंचन कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांना ठिबक सिंचन करण्यास प्रवृत्त करून सर्व कागदपत्रांची पूर्तता, बँक कर्ज, शासन प्रस्ताव, ठिबक सिंचन यंत्रणा यांचा पुरवठा केला आहे. यामुळे कागल तालुक्यात त्यावर्षी २१५ इतके शेतकरी ठिबक सिंचन पद्धत वापरत होते. शासनाचे १० टक्के अनुदान मिळणार यामुळे बँकांचे कर्ज घेतले. एकरी ४५ हजार रुपये खर्च केला. मात्र, गेली तीन वर्षे हे अनुदानच आले नाही.
कागल तालुक्यातील या शेतकऱ्यांचे जवळपास ३० ते ३५ लाख रुपयांचे हे अनुदान थांबले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता हा आकडा मोठा आहे. २०१४-२०१५ या वर्षात झालेल्या ठिबक सिंचनाचे अनुदान थकीत असताना २०१३ मधले हे अनुदान थांबविले आहे. लाभार्थी शेतकरी कृषी विभागाकडे सातत्याने हेलपाटे मारीत आहेत. थकीत अनुदान त्वरित वर्ग करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
२०१३-२०१४ मध्ये ठिबक सिंचनासाठी अल्प अनुदान आल्यामुळे २१५ पैकी ५४ जणांना कागल तालुक्यात हे अनुदान मिळाले. उर्वरित लोकांच्या अनुदानासाठी आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत. आमच्याकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. जिल्ह्यातही यावर्षी अशी परिस्थिती आहे.
-संजय वाघमारे,
कागल तालुका, कृषी अधिकारी.
शेतकऱ्यांनी संपर्क साधावा
येथील दि कागल को-आॅप. बँकेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब भोसले म्हणाले की, २०१३-१४ मध्ये आम्ही कर्जे काढून ठिबक सिंचन केले आहे. मात्र, केवळ आज, उद्या असे आश्वासनच दिले आहे. अनुदानाची रक्कम आली नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आता अनुदानासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील आणि जिल्हास्तरावरील संबंधित शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. दरम्यान, पुढील दिशा ठरविण्यासाठी कागलमध्ये बैठक घेण्यात येणार आहे.