माजी सरपंचासह आठजणांना अटक
By admin | Published: December 26, 2014 10:51 PM2014-12-26T22:51:07+5:302014-12-26T23:52:06+5:30
बेणापुरात मिळकतीची बोगस नोंद : अकरा जणांवर गुन्हा
विटा : खानापूर तालुक्यातील बेणापूर येथे न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठरावाव्दारे एकाची मिळकत दुसऱ्याच्या नावावर नोंद केल्याप्रकरणी बेणापूरचे माजी सरपंच व ग्रामपंचायतीच्या सहा माजी सदस्यांसह आठजणांना विटा पोलिसांनी अटक केली.
माजी सरपंच सतीश महादेव सुतार, माजी उपसरपंच रावसाहेब पांडुरंग जाधव, माजी सदस्य मंगेश रामचंद्र धेंडे, महात्मा बाबू कांबळे, संपत पितांबर भोसले, हणमंत विष्णू गोसावी, सौ. कमल शहाजी शिंदे व मिळकत नावावर करून घेणारे विनायक नारायण शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बेणापूर येथील मुख्य फिर्यादी दिलीप अनंत शिंदे यांच्या वडिलांचा विटा न्यायालयात दावा दाखल होता. परंतु, तो दावा रद्द झाल्यानंतर त्या दाव्याचा गैरफायदा घेऊन न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीचा संबंध भासविण्यासाठी कागदपत्रात फेरफार करून विनायक नारायण शिंदे यांच्या कुटुंबियांना ती मिळकत मिळावी म्हणून दि. ३० डिसेंबर २००२ च्या ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ही मिळकत विनायक यांचे वडील नारायण शिंदे यांच्या नावे नोंद करण्यात करून मूळ हक्कदार दिलीप शिंदे यांची फसवणूक केली गेली.
या घटनेनंतर दिलीप शिंदे यांनी विटा न्यायालयात खासगी दावा दाखल केला. त्यावेळी न्यायालयाने हे प्रकरण चौकशीसाठी विटा पोलिसांकडे सुपूर्द केले. पोलिसांच्या चौकशीअंती विनायक शिंदे, तत्कालीन सरपंच सतीश सुतार, उपसरपंच रावसाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य मंगेश धेंडे, महात्मा कांबळे, संपत भोसले, हणमंत गोसावी, सौ. कमल शिंदे, सौ. ललिता श्रीमंत शिंदे, इंदुताई राजाराम पाटील (सर्व रा. बेणापूर) यांच्यासह ग्रामसेवक बाजीराव गंगाराम चव्हाण (रा. सिध्देवाडी, ता. तासगाव) या ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील सौ. इंदुताई पाटील या मृत असून ग्रामसेवक चव्हाण आजारी आहेत. त्यामुळे पोलिसांनी मुख्य संशयित विनायक शिंदे यांच्यासह माजी सरपंच, उपसरपंच व सहा माजी सदस्यांना अटक करून विटा न्यायालयात न्या. सी. पी. भागवत यांच्यासमोर हजर केले. (वार्ताहर)
ग्रामसेवकाचाही सहभाग
बेणापूर येथील दिलीप अनंत शिंदे यांच्या वडिलांचा विटा न्यायालयात दावा दाखल होता. परंतु, तो दावा रद्द झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेऊन न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीचा संबंध भासविण्यासाठी कागदपत्रात फेरफार करून विनायक नारायण शिंदे यांच्या कुटुंबियांना ती मिळकत मिळावी म्हणून दि. ३० डिसेंबर २००२ च्या ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला. यात ग्रामसेवकाचाही सहभाग असल्याची फिर्याद देण्यात आली आहे.