सल्या चेप्यासह आठजणांना ‘मोक्का’

By admin | Published: October 6, 2015 10:28 PM2015-10-06T22:28:26+5:302015-10-06T23:52:17+5:30

बबलू माने खून प्रकरण : सल्याच्या मुलाचाही समावेश

Eight people including 'Malka' | सल्या चेप्यासह आठजणांना ‘मोक्का’

सल्या चेप्यासह आठजणांना ‘मोक्का’

Next

कऱ्हाड : वर्चस्ववादातून बबलू मानेचा ‘गेम’ करणाऱ्या सल्या चेप्याच्या टोळीवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमद्वारे (मोक्का) कारवाई करण्यात आली. या टोळीत कुख्यात गुंड सल्या चेप्यासह इतर सातजणांचा समावेश असून, आॅगस्टच्या अखेरीस हा प्रस्ताव जिल्हा पोलिसांकडून विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठविण्यात आला होता. महानिरीक्षकांनी सोमवारी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.सलीम महंमद शेख ऊर्फ सल्या चेप्या (रा. कार्वेनाका, कऱ्हाड, मूळ रा. अथणी, जि. बेळगाव), बाबर शमशाद खान (वय ४८, रा. मलकापूर), फिरोज बशीर कागदी (३३), इब्राहिम गफूर सय्यद (४८, दोघे रा. शनिवार पेठ, कऱ्हाड), मोहसीन दिलावर जमादार (२७, रा. शास्त्रीनगर-मलकापूर, मूळ रा. निपाणी, जि. बेळगाव), जावेद साहेबलाल शेख (२८, रा. मार्केट यार्ड, कऱ्हाड), इरफान हरूण इनामदार (२६, रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) व सल्याचा मुलगा आसिफ सलीम शेख (२२, रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.या आरोपींपैकी बाबर खान याला जमावाने घटनास्थळीच ठेचून ठार मारले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भाजी मंडई परिसरात २० जुलै २०१५ रोजी सकाळी बाबर खानने बबलू मानेवर गोळ्या झाडून त्याचा खून केला होता. त्यानंतर जमावाने बाबर खानला त्याच ठिकाणी ठेचून ठार मारले. बबलूच्या खूनप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत बाबर खानविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात सुरुवातीला फिरोज कागदीला अटक करण्यात आली. त्यानंतर इब्राहिम सय्यद, मोहसीन जमादार, जावेद शेख, इरफान इनामदार, आसिफ शेख या पाचजणांना अटक झाली. सल्या चेप्यावरही पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल केला होता.सल्या चेप्या हा शहरातील नामचीन गुंड असून, तो १९८९ पासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्यावर ३२ दखलपात्र, तर २ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. सातारा व सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील तो गुन्हेगार आहे. आर्थिक फायद्यासाठी त्याने अनेकवेळा वेगवेगळे साथीदार सोबत घेऊन गुन्ह्यांचा नियोजनबद्ध कट केला आहे. तसेच खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, अपहरण, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याने साथीदारांच्या मदतीने केले आहेत.सध्याही त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरू आहेत. त्यामुळे त्याच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव कऱ्हाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यामार्फत कोल्हापूरला विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला. पोलीस महानिरीक्षकांनी सोमवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे बबलू माने खून प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर करणार आहेत. या प्रकरणातील इब्राहिम सय्यद, मोहसीन जमादार, जावेद शेख, इरफान इनामदार, आसिफ शेख, फिरोज कागदी हे सहाजण अटकेत असून, सल्या चेप्याला काही दिवसांपूर्वी सांगली पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली आहे. त्याला या गुन्ह्यात वर्ग केले जाणार आहे. तसेच त्याच्यासह इतर सहाजणांना तपासासाठी अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापुढे या गुन्ह्याची कार्यवाही पुणे येथील विशेष न्यायालयात होणार आहे. दरम्यान, कऱ्हाडातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. सल्या चेप्याच्या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत झालेली कारवाई या ‘अ‍ॅक्शन प्लॅन’चाच भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)


खंडणी उकळली, सुपाऱ्याही घेतल्या--सल्या चेप्याने यापूर्वी व्यापारी व नागरिकांकडून खंडणी उकळली आहे. तसेच सुपारी घेऊन खून करणे, खुनाचा प्रयत्न करण्यासारखे गुन्हेही त्याच्यावर दाखल आहेत.वाळूत ठेके, पवनचक्क्यांवरही दहशत
प्रशासनाने लिलावाद्वारे विक्रीस काढलेले वाळूचे साठे साथीदारांच्या नावावर विकत घेऊन संबंधित ठेक्यांवर सल्या देखरेख ठेवत होता. या वाळू उपशास ग्रामस्थांनी विरोध केला तर तो दहशत निर्माण करीत होता. तसेच पाटण तालुक्यातील पवनऊर्जा कंपन्यांवरही त्याने आपला वचक निर्माण केला होता. कंपन्यांचे व्यवस्थापक अथवा मालकांकडून त्याने मोठ्या रकमा तडजोडीपोटी स्वीकारून खंडणी वसूल केल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.


बबल्याचा खुनाचा कट-सल्याच्या घरातच!
बबलू माने खून प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला सल्याचा मुलगा असिफ याच्यासह इतर पाचजणांना अटक केली होती. मात्र, सल्याचा या गुन्ह्यात सहभाग आहे का, याबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली. अखेर या गुन्ह्यात सल्या मास्टरमार्इंड असून, त्याच्याच घरात बबलूच्या खुनाचा कट शिजल्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
कऱ्हाडातील दुसरी कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी यापूर्वी मयूर गोरे खून प्रकरणातील दीपक पाटीलसह इतर पाच आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आरोपींवर कारवाईही झाली. आरोपी अद्याप तुरूंगात असून, सल्या चेप्या टोळीवर झालेली कारवाई ही कऱ्हाडातील ‘मोक्का’ची ही दुसरी कारवाई आहे.

Web Title: Eight people including 'Malka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.