नगरसेविकेच्या पतीसह आठजणांवर गुन्हा
By admin | Published: February 15, 2015 12:59 AM2015-02-15T00:59:00+5:302015-02-15T01:03:51+5:30
खासगी सावकारी प्रकरण : व्याजासाठी ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
कोल्हापूर : खासगी सावकारीतून कर्ज घेतलेल्या व्यक्तीस व्याजासाठी तगादा लावून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विद्यमान नगरसेविका माधुरी नकाते यांचे पती किरण नकाते यांच्यासह आठजणांवर शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी खासगी सावकारीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच नकातेंसह सर्व आरोपी पसार झाले.
किरण नकाते (रा. गुजरी), सुभाष मोहिते (रा. साळोखे पार्क), रूपेश सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, अतुल चव्हाण (सर्व रा. घिसाड गल्ली), दिग्विजय पवार (रा. ताराबाई पार्क), अभिजित महाडिक (मंगळवार पेठ), प्रकाश (पूर्ण नाव समजले नाही, रा. शाहू मिलजवळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, अमित रणजित शहा (वय ३४, रा. कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी) यांचे भवानी मंडप परिसरात शेतकरी सहकारी सेवा औषध दुकान आहे. या व्यवसायात ते आर्थिक अडचणीत आले होते. तसेच घरगुती व वडिलांच्या आजारपणामुळे त्यांना पैशाची गरज होती. त्यांनी आॅक्टोबर २०१३ ते आॅक्टोबर २०१४ पर्यंत वेळोवेळी आपल्या दुकानामध्ये संशयित किरण नकाते यांच्यासह त्यांच्या साथीदारांकडून २० लाख ७८ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी १७ लाख ९ हजार रुपये व्याजापोटी त्यांना परत केले असताना नकाते यांच्यासह अन्य साथीदारांनी शहा यांच्याकडे दिलेल्या रकमेवर दरमहा ४ ते ४० टक्क्यांपर्यंत व्याज आकारुन आणखीन जादा रक्कम ३० लाख ६९ हजार रुपये देण्यासाठी तगादा लावला होता. ही रक्कम वसूल करण्यासाठी ते वारंवार दुकानात येऊन तसेच फोनवरून पत्नी व मुलासह अपहरण करून ठार मारण्याची धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून शहा हे आत्महत्या करण्यासाठी घरातून निघून गेले होते. पुन्हा विचार बदलून त्यांनी शनिवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांची भेट घेतली. यावेळी खासगी सावकारीतून आपली पिळवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार मोहिते यांनी त्यांना आरोपींच्या विरोधात फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार शहा यांनी नकाते यांच्यासह अन्य संशयितांच्या विरोधात फिर्याद दिली. मुंबई सावकार कलम ५, ३३, ३४, ३९, ४५ सह भा.दं.वि.स. कलम ५०६, ३२३ व ३४ नुसार खासगी सावकारी व ठार मारण्याची धमकी असा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच संशयित नकाते यांच्यासह अन्य आरोपी मोबाईल बंद करून पसार झाले.