गारगोटी येथे आठ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:54+5:302021-09-08T04:30:54+5:30
गारगोटी : गारगोटी येथील आक्रोश मोर्चा पाहून तुझी मस्ती जिरली का नाही, असे म्हणत आठ जणांनी मारहाण केल्याप्रकरणी प्रहार ...
गारगोटी : गारगोटी येथील आक्रोश मोर्चा पाहून तुझी मस्ती जिरली का नाही, असे म्हणत आठ जणांनी मारहाण केल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र मुगडे यांच्यासह आठ जणांवर राजेंद्र चिले यांनी भुदरगड पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी मच्छिंद्र मुगडे यांनी सोमवारी (दि ६) रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढला होता. हा मोर्चा संपवून ते इतर सात जणांच्या सोबत इंजूबाई मंदिराकडे आले असता, तेथून आपल्या कामासाठी राजेंद्र चिले हे डी. वाय. पाटील शाळेकडे चालले असताना त्यांना वाटेत अडवून ‘मोर्चा पाहून तुझी जिरली का नाही?’ असे म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे, शशिकांत वाघरे, सुशांत माळवी, स्वप्निल साळोखे, जितेंद्र भाट, रोहित इंदूलकर, सचिन भांदीगरे, सुरेश देसाई यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातातील चाकूसारख्या हत्याराने मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो वार चुकवत असताना जितेंद्र भाट याने काठीने मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र चिले जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भुदरगड पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.