इचलकरंजी पोलीस दलात आठ अत्याधुनिक मोटारसायकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:27+5:302021-04-24T04:25:27+5:30
इचलकरंजी : शहरातील पोलीस दलासाठी नव्याने आठ ई-बीट मार्शल बाईक शुक्रवारी दाखल झाल्या आहेत. या बाईकद्वारे गुन्हा घडलेल्या ठिकाणी ...
इचलकरंजी : शहरातील पोलीस दलासाठी नव्याने आठ ई-बीट मार्शल बाईक शुक्रवारी दाखल झाल्या आहेत. या बाईकद्वारे गुन्हा घडलेल्या ठिकाणी तत्काळ पोहोचणे, पुरावे गोळा करणे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत होणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी दिली.
इचलकरंजी हे वस्त्रनगरीचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरात विविध राज्यांतून कामगार येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी प्रशासनाने बीट मार्शल योजनेतून बाईक खरेदी केल्या. त्यानुसार शहरातील शिवाजीनगर ३, गावभाग ३ व शहापूर पोलीस ठाण्यात २ बाईक देण्यात आल्या. कोरोनाच्या काळात नागरिकांना शिस्त आणण्यासाठी व पेट्रोलिंगसाठी या बाईकची मदत होणार आहे. सायरन, ध्वनिक्षेपक, अद्ययावत तंत्रज्ञानाची परिपूर्ण सांगड असलेल्या या बाईकमुळे तक्रारींना त्वरित प्रतिसाद देता येणार आहे.
दरम्यान, शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मिळून एकूण १२८ ठिकाणी क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात आले आहे. त्या प्रत्येक ठिकाणी या बाईक फिरणार आहेत. आपत्कालीन व अत्यावश्यक कारणांसाठी नागरिकांना ११२ नंबरवर अथवा क्यूआर कोड स्कॅन करून तक्रार देता येणार आहे. २४ तासांत या बाईकच्या माध्यमातून गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिसांकडून होणार आहे.
फोटो ओळी
२३०४२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजी पोलीस दलासाठी नव्याने आठ ई-बीट मार्शल बाईक शुक्रवारी दाखल झाल्या आहेत.
छाया - उत्तम पाटील