अठरा गुन्हेगार वर्षासाठी होणार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:37 AM2020-12-14T04:37:30+5:302020-12-14T04:37:30+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १८ गुन्हेगारांना वर्षासाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ...
कोल्हापूर : महानगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १८ गुन्हेगारांना वर्षासाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
अधीक्षक बलकवडे म्हणाले, आगामी काही महिन्यांत महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा मध्यवर्ती बँक, ‘गोकुळ’सह काही साखर कारखान्यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्याची खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेतून गुन्हेगारांवर पोलिसांचा कायमच वचक राहावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘मोक्का’तील फरार संशयित सम्राट कोराणे, इचलकरंजीतील तेलनाडे बंधू यांच्यासह काही आरोपींचीही विशेष शोधमोहीम हाती घेण्यात येत आहे. या फरार संशयितांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गुन्हेगाराचे स्वतंत्र, अद्ययावत रेकॉर्ड तयार करण्याचे काम त्या-त्या पोलीस ठाण्याकडे सुरू आहे. तसेच गुन्हेगारांच्या टोळ्यांच्याही मुसक्या आवळण्यात येत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १८ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षासाठी हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी पाठविला आहे.
कोट...
जिल्ह्यात आगामी निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पाडाव्यात यासाठी गुन्हेगारांच्या हालचालींवर पहारा ठेवला असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहेत. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा
(तानाजी)